कोंबिंग ऑपरेशनवरुन सुषमा अंधारेंनी सरकारला फटकारले
। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबई मराठवाड्यातील परभणी येथे बुधवारी (दि.11) संध्याकाळपासून पोलीस प्रशासनाने कोंबिंग ऑपरेशन सुरु केले आहे. राज्याला गृहमंत्री नाही, अशा परिस्थितीत राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी कोणी आणि कशी हाताळावी हा प्रश्न निर्माण झाला असल्याचा सवाल करत परभणीत सुरु असलेली पोलीस कारवाई चुकीची असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी एक व्हिडिओ समाज माध्यमावर पोस्ट करत परभणीतील कोंबिंग कारवाईवरुन सरकारला धारेवर धरले आहे.
सुषमा अंधारेंनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यात त्या म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला, त्यानंतर ते काळजीवाहू मुख्यमंत्री राहिले आहेत. तेव्हापासून आतापर्यंत राज्याला गृहमंत्री नाहीय. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर तो कोणी हाताळावा आणि कसा हाताळावा, हा प्रश्न निर्माण झाला आहे, असे सांगत त्यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे.
सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, परभणी हा अत्यंत संवेदनशील जिल्हा आहे. पँथर चळवळीतील अनेक नेत्यांचे निवासस्थान परभणीमध्ये आहे. अशा परिस्थितीत परभणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाची प्रतिकृती उद्धवस्त केली जात असताना त्याची प्रतिक्रिया उमटणार हे स्वाभाविकच होते. आंबेडकरी विचारांच्या संघटनांनी पुकारलेला बंद ही सहाजिक प्रतिक्रिया होती. त्यासाठी पोलिसांकडून पूर्वतयारी करणे आपेक्षित होते. व्यापरपेठेला तशी कल्पना देणे आपेक्षित होते. एकदा बंद पुकारला आहे तेव्हा व्यापरपेठेकडूनही बंदला प्रतिसाद देणे आपेक्षित होते. परंतु, काही लोकांनी व्यापरपेठा चालू ठेवल्या. बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बाजारपेठेतील काही दुकाने सुरु होती, ती बंद करण्यासाठी आंदोलकांकडून बंदचा आग्रह धरण्यात आला. आंदोलकांनी आवलंबलेल्या मार्गाचे समर्थन करता येत नाही, मात्र अशी घटना घडण्याला कारणीभूत पोलीस यंत्रणा आहे, राज्याचे गृहखाते जबाबदार आहे, असा आरोप अंधारेंनी गृह खात्यावर केला आहे.
कोंबिंगच्या नावाखाली पिढ्या बरबाद
सुषमा अंधारे म्हणाल्या की, पोलीस खात्याकडून तिथे कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी तरुणांचे आयुष्य आणि भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून चालू असेल तर हा निंदनीय आणि निषेधार्ह प्रकार आहे. विटंबनेच्या घडलेल्या घटनेची चौकशी करण्यापेक्षा कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली पिढ्या बरबाद करण्याच्या घटनेचा शिवसेना ठाकेर गट निषेध करत असल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.