उरणकरांचा प्रवास होणार सुसाट

नवी मुंबई, पनवेलच्या वाहतूक कोंडीतून सुटका
करळ, जाईस परिसरात दोन उड्डाणपुलांची उभारणी

| उरण | वार्ताहर |
मुंबई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि पुणे अशा महत्त्वाच्या शहरातून उरण-जेएनपीटी बंदर परिसरात येणार्‍या वाहन चालक, प्रवासी नागरिक यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे प्रवासी अक्षरशः मेटाकुटीला येतात. करळ, जासई परिसरातील उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे हा प्रवास सुसाट होणार असल्याने नोकरदारवर्गाने समाधान व्यक्त केले आहे.

उरण हा मुंबई, नवी मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेला तालुका आहे. या तालुक्यात केंद्र व राज्य सरकारच्या अधिपत्याखाली असणारे महत्त्वाचे प्रकल्प तसेच खासगी प्रकल्प आहेत. तसेच देश परदेशात मालाची वाहतूक करणारे जेएनपीटी बंदरावर आधारित महत्त्वाचे बंदराची उभारणी करण्यात आली आहे. अशा या प्रकल्पात तसेच बंदरात ये-जा करणार्‍या वाहनांची रेलचेल ही हजारोंच्या संख्येने रात्री-अपरात्री सुरू असते. त्यामुळे मुंबई,नवी मुंबई,ठाणे, कल्याण डोंबिवली, पनवेल आणि पुणे अशा महत्त्वाच्या शहरातून उरण-जेएनपीटी बंदर परिसरात येणार्‍या वाहन चालक, प्रवासी नागरिक यांना अरुंद रस्त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत.

यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जेएनपीटी बंदर व केंद्र, राज्य सरकारच्या माध्यमातून उरण-जेएनपीटी बंदर परिसरात चार ते आठ पदरी काँक्रिटचे रस्ते करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको तसेच नॅशनल हायवे इंडिया अ‍ॅथॉरिटीच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. या रस्त्याचे काम पूर्ण होत असतानाच भविष्यात वाहतूक कोंडीची समस्या वाढत्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या संकल्पनेतून ज्या ज्या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते, तेथे उड्डाणपुलाची उभारणी केली आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत करळ रेल्वे क्रॉसिंगवर भव्यदिव्य उड्डाणपुलाची उभारणी केली आहे.

या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून, त्याचे उद्घाटन हे मागील वर्षी जेएनपीटी चेअरमन संजय शेठी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. सध्या जासई ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत जासई नाका व जासई-चिर्ले रेल्वे क्रॉसिंग या दोन उड्डाणपुलाचे काम हे नॅशनल हायवे इंडिया अ‍ॅथॉरिटी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरू आहे. या उड्डाणपुलाचे काम हे सध्या धीम्या गतीने सुरू असल्याने जासई परिसरात वाहतूक कोंडीची समस्या होत आहे. या दोन उड्डाणपुलांचे काम लवकरात लवकर पूर्ण झाले तर वाहतूक कोंडीची समस्या कायमची दूर होणार असून, वाहन चालकांच्या इंधनाची बचत होईल आणि प्रवासी नागरिकांचा वेळ, पैसा वाचून त्यांचा प्रवास हा सुसाट सुखकर होणार आहे.

Exit mobile version