पालकमंत्री अदिती तटकरे यांची माहिती
। माणगाव । वार्ताहर ।
जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व प्रस्तावित दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांच्या तीन नव्या निवासस्थानासाठी विधी व न्याय विभागाची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असल्याची माहिती राज्यमंत्री तथा पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
माणगाव येथे नव्याने बांधण्यात येणार्या तीन न्यायाधीश निवासस्थानांसाठी 3 कोटी 08 लाख 55 हजार 299 रुपयांच्या प्रशासकीय मान्यतेबाबतचा शासन निर्णय आज विधी व न्याय विभागामार्फत निर्गमित करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार या निवासस्थानांसाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग, फर्निचर, पाणीपुरवठा व मलनि:स्सारण, अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण, अग्निशमन यंत्रणा आदी आवश्यक कामे व कंपाऊंड वॉल, अंतर्गत रस्ते, पार्किंग, बाग-बगीचा व भू-तपासणी आदी संकीर्ण कामे प्रशासकीय अटींच्या अधीन राहून पूर्ण केली जाणार आहेत.
रायगड जिल्ह्यातील वाढते औद्योगिकीकरण, मुंबई-गोवा हा महत्त्वाचा महामार्ग तसेच इतर दळणवळणाच्या माध्यमातून मुंबईलगत असणार्या माणगाव तालुक्यातील वाढते शहरीकरण व नागरिकीकरणाच्या दृष्टीने येथील न्याय व्यवस्थेतील महत्त्वाच्या बांधकामांचे नूतनीकरण व अद्ययावतीकरण करणे आवश्यक होते. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून या न्यायाधीश निवासस्थानांचे बांधकाम करण्यात येणार आहे.