बांगलादेशवर डाव अन् 51 धावांनी विजय; कसोटी मालिका बरोबरीत संपवली
| मॅके | वृत्तसंस्था |
ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना मॅकेच्या ग्रेट बॅरियर रीफ एरिना मैदानावर खेळवण्यात आला. या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा डाव आणि 51 धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत संपवली. डार्विनमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत बांगलादेशने ऑस्ट्रेलियाचा 9 गडी राखून पराभव केला होता. त्यामुळे मॅके कसोटीत ऑस्ट्रेलियासमोर मालिका वाचवण्याचे आव्हान होते. मात्र, यावेळी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजांना कोणतीही संधी दिली नाही.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 210 धावांवर संपला होता. मात्र, पहिल्या डावात बांगलादेशला केवळ 64 धावाच करता आल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 146 धावांची मोठी आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरॉन ग्रीनने 10 चौकारांच्या मदतीने 67 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. स्टीव्ह स्मिथने 42 धावा केल्या, तर नॅथन लायन 32 धावांवर नाबाद राहिला. बांगलादेशकडून शोरिफुल इस्लामने शानदार गोलंदाजी करत 7 बळी घेतले. मात्र, त्याची ही कामगिरी संघाच्या खराब फलंदाजीमुळे व्यर्थ गेली. तसेच तैजुल इस्लाम, मेहदी हसन मिराज आणि तस्किन अहमद यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
फॉलोऑन मिळाल्यानंतर मैदानात उतरलेल्या बांगलादेशला ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच धक्के दिले. मिचेल स्टार्कने आपल्या दुसऱ्या षटकात सलग दोन चेंडूंवर शदमन इस्लाम आणि मोमिनुल हक यांना बाद करत बांगलादेशची अवस्था बिकट केली. त्यानंतर पॅट कमिन्सने तंझीद हसन तमीमला बाद करत बांगलादेशला आणखी एक धक्का दिला. अवघ्या 24 धावांवर तीन गडी गमावल्यानंतर बांगलादेशचा डाव सावरण्याचा प्रयत्न झाला. कर्णधार नजमुल हुसैन शांतो आणि मुशफिकुर रहीम यांनी 27 धावांची भागीदारी करत डावाला थोडा आधार दिला. मात्र, नॅथन लायनने शांतोला बाद करत ही भागीदारी मोडली आणि त्यानंतर पुन्हा एकदा बळींची रांगच लागली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर बांगलादेशच्या फलंदाजांकडे कोणतेही उत्तर दिसले नाही. टी-ब्रेकनंतर लगेचच बांगलादेशचा डाव संपुष्टात आला. मुशफिकुर रहीमने एका बाजूने झुंज देत 29 धावा नाबाद केल्या, तर कर्णधार नजमुल हुसैन शांतोने 31 धावांची सर्वाधिक खेळी केली. याशिवाय एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. यावेळी बांगलादेशचा संपूर्ण संघ अवघ्या 95 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे मॅके कसोटीचा निकाल अवघ्या दोन दिवसांत लागला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचा हिरो वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा ठरला. डावखुऱ्या स्टार्कने बांगलादेशच्या दुसऱ्या डावात 4 बळी घेतले. त्याला कर्णधार पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांनी प्रत्येकी 3 बळी घेत चांगली साथ दिली. ऑस्ट्रोलीयाच्या गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सामना डाव आणि 51 धावांनी जिंकला आणि पहिल्या कसोटीतील पराभवाचा वचपा काढत मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली.
अनोखा पराक्रम
या सामन्यात एक अनोखा पराक्रम पाहायला मिळाला. मिचेल स्टार्क आणि शोरिफुल इस्लाम या दोन्ही डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांनी काही तासांच्या अंतराने 6-6 बळी घेतले. कसोटी क्रिकेटच्या 149 वर्षांच्या इतिहासात एकाच सामन्यात दोन डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांनी 6 बळी घेण्याची ही केवळ दुसरी वेळ ठरली. यापूर्वी असा पराक्रम 1958-59 च्या नववर्ष ऍशेस कसोटीत झाला होता.
मिचेल स्टार्क ठरला हिरो
यावेळी ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो मिचेल स्टार्क ठरला. पहिल्या डावात त्याने अवघ्या 12 धावा देत 6 बळी घेतले होते. दुसऱ्या डावातही स्टार्कचा धडाका कायम राहिला. त्याने आणखी चार फलंदाजांना माघारी पाठवत संपूर्ण सामन्यात त्याने 51 धावा देत 10 बळी आपल्या नावावर केले. ही कामगिरी स्टार्कच्या कसोटी कारकिर्दीतील एका सामन्यातील दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. विशेष म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये एका सामन्यात 10 किंवा त्याहून अधिक बळी घेण्याची त्याची ही चौथी वेळ आहे.
