पिंट्या ठाकूर यांचा आंदोलनाचा इशारा
| रायगड | खास प्रतिनिधी |
पावसाळा सुरू होऊन अवघे 15 दिवसच झाले आहेत. असे असताना कार्लेखिंड ते वडखळ या मार्गाची खड्ड्यांमुळे प्रचंड दुरवस्था झाली आहे. लवकरात लवकर या महामार्गावरील खड्डे भरा अन्यथा तीव्र जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उबाठा) चे युवा जिल्हा प्रमुख अमीर उर्फ पिंट्या ठाकूर यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पनवेल यांना दिले आहे.
अलिबाग-कार्लेखिंड-वडखळ हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा आहे. 24 कि.मी. लांबीचा हा रस्ता असून, अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. गेल्या सात ते आठ वर्षांपासून प्रवाशांना खड्डेमय रस्त्यानेच प्रवास करावा लागत आहे. मध्यंतरी काही काळ या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. परंतु, आता पुन्हा या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अलिबागमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक आपापली वाहने घेऊन येतात. खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटनाही घडत आहेत. तरीही रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी अधिकारी तयार नाहीत, असा सूर जनतेमधून उमटत आहे.
अलिबाग शहराला जोडणार्या वडखळ-अलिबाग महामार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत असून, वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होत असल्याचे अमिर ठाकूर यांनी सांगितले.
अलिबाग हे जिल्ह्याचे मुख्यालय आणि प्रमुख पर्यटन स्थळ असल्याने येथे दररोज येणार्या वाहनांची संख्या मोठी आहे. त्यामुळे येथे सातत्याने वर्दळ सुरु असते. याशिवाय अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. यामुळे रस्त्यावरून हजारो वाहने ये-जा करत असतात. तिनविरा ते पोयनाड तसेच धरमतर ते वडखळ परिसरात रस्त्याला भरमसाठ खड्डे पडले आहेत. त्यामुळे कार्लेखिंड ते वडखळ रस्त्याची झालेली दुरवस्था, त्यामुळे होणारे अपघात व जनतेला होणार्या त्रासामुळे या रस्त्याची तातडीने दुरूस्ती न झाल्यास आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा ठाकूर यांनी दिला आहे.