वेलशेत क्रिकेट चषकाचा मानकरी ठरला खारापटी-रोहा संघ

। नागोठणे । वार्ताहर ।
मनसेचे आ. राजू पाटील प्रणीत वेलशेत येथील मनसे आमदार चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात योगेश पोकळे पुरस्कृत वैशाली स्मृती खारापटी-रोहा संघाने श्री बापदेव, वणी संघाचा पराभव करून मनसे आमदार चषकावर आपले नाव कोरले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रोहा तालुका व नवनिर्माण सेवाभावी संस्था यांच्यातर्फे तिसर्‍या वर्षी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या खारापटी संघाला 1 लाख रुपयांचे पारितोषिक व आकर्षक चषक तर उपविजेत्या वणी संघाला 50 हजार रुपयांचे पारितोषिक व आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेला आमदार राजूदादा पाटील यांना काही कारणास्तव उपस्थित राहता न आल्याने त्यांनी स्पर्धेला शुभेच्छा पाठविल्या होत्या.
साई झिराड-अलिबाग व धनविर स्पोर्टस्, अलिबाग या संघांना अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांकाचे प्रत्येकी 25 हजार रुपये पारितोषिक व आकर्षक चषक देण्यात आला. तर संपूर्ण स्पर्धेत 9 गडी बाद करून 68 धावा करणारा खारापटी संघाचा सलमान सिध्दीकी याला अंतिम सामण्याचा सामनावीर म्हणून कुलर व मालिकावीरासाठी एलईडी टीव्ही देऊन गौरविण्यात आले. तर उत्कृष्ठ गोलंदाज म्हणून धनविर संघाचा समर्थ कडू व उत्कृष्ठ फलंदाज म्हणून संपूर्ण स्पर्धेत 117 धावा फटकविणारा वणी संघाचा सोनू सिंग यांना स्पोर्टस् शुज देऊन गौरविण्यात आले.
या क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण देवेंद्र गायकवाड, संजय गायकवाड,संदेश शेवाळे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी साईनाथ धुळे, प्रल्हाद पारंगे, गोरखनाथ पारंगे, नरेश भंडारी, दयाराम ताडकर, मंगेश कामथे, दिपेश्री घासे, आदेश पारंगे, स्वरा भंडारी, शीतल जगताप, भावना भोईर, पूनम डोलकर आदींसह अनेक मान्यवर व क्रिकेटप्रेमी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते. स्पर्धेचे उत्कृष्ठ असे समालोचन अलिबाग येथील संतोष वाघमारे, संतोष ताडकर व दिपक चोरगे यांनी केले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सचिन पारंगे, ज्ञानदेव पारंगे, मनोज पारंगे, हर्षद मळेकर, शशांत पारंगे, प्रफुल्ल पाटील, राहुल पाटील, संजय शहासने, पंकज लवटे आदींनी मेहनत घेतली.

Exit mobile version