तक्रारदाराला मालकाकडून अरेरावी
| पेण | प्रतिनिधी |
पेण चावडीनाका येथे प्रभात बेकरीतील खारी खाल्ल्याने एका लहान मुलीची प्रकृती अस्वस्थ झाली. खारी फोडून पाहिली असता खारी आतून खराब असल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याची माहिती प्रभात बेकरीच्या मालकाला दिली असता त्याने अरेरावीची भाषा वापरत उलट ग्राहकाला दमबाजी करण्याचा प्रकार घडला. आरोग्याशी खेळणार्या बेकरीवर कारवाई व्हावी, या उद्देशाने सोमवारी (दि. 24) अन्न व औषध प्रशासनाकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.
याबाबत हकीकत अशी की, राजन पाटील यांनी रोजच्या प्रमाणे प्रभात बेकरीमधून खारी नेली. त्यांच्या छोट्या मुलीने सकाळी खारी खाल्ल्याने तिला त्रास होऊ लागला. म्हणून राजन यांच्या पत्नी अहाना यांनी खारी फोडून पाहिली असता ती आतून खराब असल्याचे जाणवले. याबाबत प्रभात प्रभात बेकरी मालक वसंत पारवानी यांना राजन यांची पत्नी अहाना या जाब विचारायला गेले असता बेकरी मालक वसंत याने अरेरावीची भाषा करून कुणालाही तक्रार करा, मी घाबरत नाही. आम्ही दिलेली वस्तू परत घेत नाहीत, तसेच आमची वस्तू खराब नसते. आमच्या बेकरीचे नाव आहे. तुम्ही कुणाकडेही तक्रार करू शकता, असे धमकावले. दरम्यान, या घटनेची माहिती राजन पाटील यांनी पत्रकारांना दिली. पत्रकारांसह ते स्वत: बेकरीत पोहोचल्यावर बेकरी मालकाची अरेरावीची भाषा बदलली. प्रसार माध्यमांचे प्रतिनिधींनी बेकरी मालकाला जाब विचारल्यावर बेकरी मालकाचा आवाज खाली आला. त्यानंतर सर्व बाबींचे निरीक्षण केले असता बेकरीमध्ये काम करणार्या कामगारांपासून बेकरीमध्ये पदार्थ तयार होत असणार्या खोलीमध्ये अस्वच्छता दिसून आली. हा लोकांच्या आरोग्याशी खेळणारा प्रकार असून, खराब पदार्थ खाल्ल्याने भविष्यात कधीही कोणताही रोग होऊ शकतो. मोठा आजार होण्याचीही शक्यता असते. यामुळे कायद्यानुसार प्रभात बेकरीवर कारवाई व्हावी, अशी मागणी राजन पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी एम.आर. घोसलवाड यांच्याकडे भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करुन झालेली घटना त्यांच्या कानावर घातली आहे. त्यावर त्यांनी आज मी ठाण्यात आलो आहे, उद्या येऊन तपासतो, आपण लेखी तक्रारही द्या, असे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे अधीक्षक अन्न व औषध प्रशासक यांना लेखी तक्रारही दिली आहे. अरेरावी करणार्या अशा बेकरी मालकांविरूद्ध व निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ विकणार्यांवर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे. कारवाई न झाल्यास प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आरोग्य मंत्र्यांकडे सदरची तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले.
नागरिकांनो, सावधान! प्रभात बेकरी कित्येक वर्षे बेकरी पदार्थाची विक्री करत आहे. मधल्या काळात अनेक वेळा या बेकरी मालकाच्या अरेरावीचे किस्से समोर आले; परंतु कुणी तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. परंतु, आता या बेकरीतील पदार्थांची पोलखोल झाली आहे. नागरिकांचा येथील पदार्थांवर विश्वास असल्याने ते डोळे मिटून पदार्थ खरेदी करीत होते. परंतु, त्याचा गैरफायदा बेकरी मालकाने घेतल्याची चर्चा सध्या पेणमध्ये आहे.