दर्याचा राजा ‘शिमगोत्सवा’साठी परतला

मुरुड किनारी शेकडो बोटींचे आगमन
जेटीवर लहानमुले आपल्या स्वागत करण्यासाठी तयार

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
मागील चार महिन्यांपासून वातावरणातील बदलल्यामुळे मासे फार अल्प प्रमाणात मिळत आहेत. त्यामुळे प्रमुख आर्थिक स्रोतावर गंभीर संकट असूनसुद्धा होळी सणात याचे कुठेही सावट दिसत नाही. होळी सण साजरा करण्यासाठी असंख्य बोटी किनार्‍यावर येत आहेत. मुरुड परिसरात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा होते. होळीच्या दिवस आधी मासेमारीसाठी गेलेल्या बोटी होळीसाठी परतात, तेव्हा किनार्‍यावर येण्याआधी आपली बोट समुद्रात असतानाच फुलांनी सजवतात, भगवे झेंडे, पिवळे झेंडे, बोटीवर डिझे स्पीकर लावून घरी परताना कोळी गाणी वाजवत, नाचत गुलाल उधळत मुरुड किनार्‍यावर येतात. फटाके वाजवत येणार्‍या बोटींना पाहण्यासाठी मुरुडकर एकदरा पुलावर गर्दी करतात. आपली सजलेली बोट जेटीवर तिचे स्वागत घरातील लहान मुले, महिला पूजन करवून करतात. हा आगळावेगळा सोहळा मुरुडच्या किनार्‍यावर कालपासून सुरु झाला आहे.

सध्या असंख्य होड्या मुरुड तालुक्यातील नांदगाव, राजपुरी, एकदर, आगरदांडा, दिघी येथे येत असून, होळीसाठी मुंबईतून समस्त कोळी बांधव येत आहेत. मुंबईतून निघताना बोटी विविध रंगबिरंगी कापडाच्या झुलीने सजविल्या जातात. विविध फुले, रंगाच्या पताका, रंगीबेरंगी झेंडे व कोळी लोक पारंपरिक वेशभूषा परिधान करून प्रथम खंदेरी येथे वेताळ देवाचे दर्शन घेऊन त्याची पूजाअर्चा करून येणार्‍या दिवसात चांगली मासळी मिळावी व समुद्रदेवतेपासून आपले सदैव रक्षण व्हावे, अशी वेताळ देवापुढे प्रार्थना करतात. सालाबादप्रमाणे या वेळीही मुरुड येथील चंद्रकांत सरपाटील यांच्या दोन्ही नौका व मुरुड समस्त कोळी बांधवांच्या नौका वेताळ देवाचे दर्शन घेऊन घरी परतलेल्या आहेत. होळी सणाच्या काही दिवस अगोदर या नौका आपल्या गावी दाखल होत असतात.

मुरुड तालुक्यात सुमारे 650 होड्या असून, त्या किनारी लागलेल्या आहेत. या सजलेल्या नौका बंदरात दाखल होत असताना संबंधित नौकांच्या घरची माणसे खूप आतुरतेने वाट पाहात असतात. करून आल्यानंतर सर्व कोळी बांधव बोटीवर काम करणार्‍या सहकार्‍यांच्या घरी जाऊन त्यांच्या सुख-दु:खात सामील होऊन आपले आपापसातील संबंध दृढ करीत असतात. बोटीवरील एखादा खलाशी आर्थिकदृष्ट्या कमजोर असेल तर होळी सण साजरा करण्यासाठी आर्थिक मदत करीत असतात. होळीनंतर दुसर्‍या दिवशी धूलिवंदनचा सणसुद्धा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

आनंदाची उधळण
बांधव होळी हा सण मोठ्या आनंदाने साजरा करीत असतात. आपल्या वर्षभरातील आपापसातील सर्व वैमनस्य विसरून गुण्यागोविंदाने हा सण साजरा करीत असतात. या होळीमध्ये तरुण व वृद्ध स्त्री-पुरुष आवर्जून सहभागी होतात. सर्व दु:ख विसरून आनंद उधळणार हा सण म्हणून समस्त कोळी समाज होळी सणाची दरवर्षी आतुरतेने वाट पाहात असतो, अशी कोळी बांधव प्रकाश सरपाटील यांनी व्यक्त केली.

Exit mobile version