लाल मातीचा बादशाह पराभूत

116 सामन्यांत केवळ चौथ्यांदा पराभव

। पॅरिस । वृत्तसंस्था ।

लाल मातीचा बादशहा असे सामाज्र निर्माण करणार्‍या राफेल नदालला यंदाच्या फ्रेंच ओपन स्पर्धेत पहिल्याच फेरीत बाद व्हावे लागले. त्याने दुखापतीनंतर पुनरागमन केले असले तरी ही त्याची अखेरची फ्रेंच ओपन असल्याचेही बोलले जात आहे. अनेक दुखापतींचा सामना करत नदालने जिद्दीने यंदा फ्रेंच स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला खरा; परंतु चौथ्या मानांकित अलेंक्झँडर झ्वेरेवचा अडथळा तो पार करू शकला नाही. झ्वेरेवने हा सामना 6-3, 7-6 (7-5) 6-3 असा पराभव केला.

या फ्रेंच ओपन स्पर्धेत नदालने सर्वाधिक 14 वेळा विजेतेपद मिळवलेले आहे. गतवर्षी तो दुखापतीमुळे सहभागी झाला नव्हता. नदालसाठी ही लढत सोपी नसणार हे उघड होते. एरवी या स्पर्धेत बादशहाप्रमाणे वावरणार्‍या नदालचा आत्मविश्‍वास काहीसा कमी वाटत होता. पहिला सेट सहज गमावला असला तरी या कोर्टवर अशा पिछाडीनंतर त्याने अनेक सामने आणि विजेतेपदही मिळवलेले आहे. दुसर्‍या सेटमध्ये त्याने आपला सर्व अनुभव पणास लावला. 5-5 बरोबरी साधत हा सेट पुढे टायब्रेकरवर नेला; परंतु तेथे त्याची लढत थोडक्यात कमी पडली. त्यानंतर नदाल पाठीमागेच पडत गेला. नदालच्या तुलनेत झ्वेरेवचे पहिल्या सर्व्हिसवर चांगले नियंत्रण होते. त्याच्या पहिल्या आणि दुसर्‍या सर्व्हिसचा वेगही अधिक होता. तसेच, ब्रेक पाँईंटचे रूपांतर यशामध्ये करण्यात तो 33% : 18% इतका पुढे होता. त्याचे विनर्सही 44:33 असे होते. नदालसाठी मैदानी फटके मात्र अफलातून होते; परंतु ते त्याला विजय मिळवून देण्यास पुरेसे ठरले नाहीत.

पराभवानंतर नदाल झाला भावुक
दरम्यान 14 वेळा फ्रेंच ओपन जिंकणारा नदाल पराभवानंतर भावुक झाला होता. सामन्यानंतर बोलताना नदाल म्हणाला, माझ्यासाठी व्यक्त होणे कठीण आहे. मला माहित नाही की हे शेवटचे आहे की नाही, मी पुन्हा खरंच तुमच्या सर्वांसमोर असेल की नाही. मला याची 100 टक्के खात्री नाही. पण जर हे शेवटचे असेल, तर मी त्याचा आनंद घेतला. मी तयारी करताना मला प्रेक्षकांकडून गेल्या आठवडाभरात खूप चांगला पाठिंबा मिळाला. आता ज्या काही भावना उंचबळून आल्यात त्यांना शब्दात मांडणे कठीण आहे. पण लोकांचे प्रेम माझ्यासाठी स्पेशल आहे.
लाल मातीचा बादशाह
नदालला लाल मातीचा बादशाह असे म्हटले जाते. कारण त्याने तब्बल 14 वेळा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली आहे. झ्वेरेवविरुद्धचा त्याचा या स्पर्धेतील 116 वा सामना होता. विशेष म्हणजे या 116 सामन्यात त्याने केवळ चौथ्यांदा पराभव स्विकारला. तसेच, नदालला फ्रेंच ओपनमध्ये पराभूत करणारा झ्वेरेव केवळ तिसरा टेनिसपटू आहे. यापूर्वी त्याला दोन वेळा नोवाक जोकोविच आणि एक वेळा रॉबिन सॉडर्लिंगने पराभूत केले आहे.
Exit mobile version