थळ चाळमळा कोळी समाजाचे खळे उध्वस्त

अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
तालुक्यातील थळ ग्रामपंचायत हद्दीतील चालमळा समुद्र किनारी मासळी सुकविण्यासाठी बांधलेले सिमेंट खळे थळ ग्रामपंचायत प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात उध्वस्त केले. संपूर्ण जिह्यात धनदांडग्यांचे हजारो अनधिकृत बांधकामे असताना त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या प्रशासनाने गोरगरीब कोळी समाजावर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाईचा बडगा उचला आहे. या कारवाईमुळे कोळी समाजाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या कारवाई दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून अलिबागचे नायब तहसिलदार अजित टोळकर, पंचायत समिती गटविकास अधिकारी दीप्ती देशमुख, प्रशासन अधिकारी साळावकर, ग्रामसेवक आदींसह शेकडो पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
अलिबाग तालुक्यातील चाळमळा येथे मच्छीमारांची पारंपरिक वसाहत आहे. समुद्रकिनार्‍यावरील या वसाहतीत 150 ते 200 कुटुंबे गेल्या तीन पिढयांपासून वास्तव्याला आहे. समुद्रात मिळालेली ओली मच्छी आणायची, ती गावालगतच्या मोकळ्या जागेत सुकवून विक्री करायची हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. गावातील मच्छीमारांनी किनार्‍यालगतच्या शासकीय जागेत मासे सुकवण्यासाठी ओटे आणि ऊनपावसापासून बचावासाठी ओटे बांधले आहेत. मच्छी सुकवण्यासाठी बांधण्यात आलेले शासकीय जमिनीत बेकायदेशीरपणे बांधण्यात आल्याचे कारण पुढे करत हे ओटे तातडीने हटविण्याची कारवाई थळ ग्रामपंचायतीने केली. मच्छीमार गावालगतच्या खुल्या सरकारी जागा या मत्स्य व्यवसायासाठी राखून ठेवण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष करत स्थानिक ग्रामपंचायतीने मच्छीमारांना अतिक्रमण केल्याप्रकरणी नोटिसा बजावल्या होत्या.
त्यामुळे मच्छीमांरामध्ये असंतोषाचे वातावरण आहे. मासेमारी हाच आमचा प्रमुख व्यवसाय आहे. गेली अनेक वर्षे आम्ही या जागेत मासे सुकवत आलो आहोत. आता गावात नव्याने आलेल्या काही बंगलेवाल्यांना माशांचा वास येत असल्याचे कारण पुढे करत आम्हाला या जागेतून बेदखल करण्याचा घाट स्थानिक ग्रामपंचायतीने घातला आहे. यामुळे मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येईल, अशी भीती कोळी समाजाने व्यक्त केली आहे.
गेल्या चार-पाच वर्षांत थळ समुद्रकिनार्‍यावर देशातील नामांकित उद्योजक, अभिनेते आणि बांधकाम व्यावसायिकांनी समुद्रकिनार्‍यावर जागा खरेदी केल्या आहेत. या जागांमध्ये सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करत आलिशान बंगले उभारण्यात आले आहेत. या अनधिकृत बांधकामांकडे ग्रामपंचायतीने सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे. मात्र स्थानिक भूमिपुत्रांनी मासे सुकवण्यासाठी बांधलेल्या ओटयांवर कारवाईचा केली. स्थानिक प्रशासनाच्या दुटप्पी धोरणाबाबत स्थानिकांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.

Exit mobile version