मोराबीनचे कुकाबूरा आणि हॅरी व डेव्हिड!

क्रिकेट या खेळाची दोन प्रमुख आयुधं आहेत बँट आणि बॉल. ऑस्ट्रेलियाच्या या मेलबर्न शहरानजीक मोराबीन नावाची एक जागा आहे. ए.जी. थॉम्सन नावाच्या एका ऑस्ट्रेलियन माणसाने तेथे स्थापन केलेला ‘कुकाबूरा’ या चेंडूची निर्मिती करणारा कारखाना आहे. ‘कूकाबूरा’ हा एका ऑस्ट्रेलियन पक्षी आहे. त्याच्या नावाने त्यांनी क्रिकेट आणि हॉकी या खेळातील चेंडूची निर्मिती सुरु केली. तब्बल 130 वर्षांची ही परंपरा आहे. तब्बल सव्वाशे वर्षांच्या या वाटचालीमध्ये थॉम्सन कुटुंबियांमध्ये कोणत्याही अन्य उद्योगसमूहाचा किंवा आर्थिक मदतनीसाचा आधार घ्यावा लागला नाही, हे विशेष.

शतकाची परंपरा लाभलेल्या या कुकाबूरा उत्पादनाच्या मेलबर्नमधील फॅक्टरीमध्ये एक विस्मयकारी गोष्ट पहायला मिळाली. आता क्रिकेटच्या चेंडूची शिलाई मशीनवर केली जाते. यापूर्वी पूर्णपणे हातशिलाई असणारे चेंडूच वापरले जायचे. जे चेंडू चांगल्या ‘ग्रीप’साठी आजही लोकप्रिय आहेत. गेली 80 वर्षांची हातशिलाईची ही परंपरा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, या कलेचे दोन अखेरचे शिलेदार हॅरी आणि डेव्हिड अजूनही कुकाबूराच्या फॅक्टरीत कार्यरत आहेत.

हॅरी आणि डेव्हिड हे मूळचे ‘सायबू’ या युरोपातील एका गावातले. चेंडू शिवण्याच्या कलेमुळे ते येथे पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून नोकरीला आले. या गोष्टीस आता चाळीस वर्षे लोटली. हॅरी आणि डेव्हीड हे दोघेही अजून कुकाबूराच्या फॅक्टरीत काम करताहेत. मशिन्स आल्या, रोबोटीक उत्पादन वाढले. पर्यायच उरला नाही. त्यांच्यासोबत सायबू येथून आलेले सुमारे 45 ते 50 जण निवृत्तही झाले.

हॅरी आणि डेव्हीड मात्र कामाचा आनंद लुटण्याकरिता येथे काम करताहेत. ऑस्ट्रेलियात काम करणार्‍यांसाठी वयाची मर्यादा नाही. फक्त निवृत्तीनंतरचे लाभ उठवायचे नसतील तर तुम्ही कितीही वर्षांपर्यंत काम करु शकतात. हॅरी आणि डेव्हीड दररोज 20-20 चेंडू शिवतात. चार तास ते हे काम करतात. नंतरचा दीड तास ते फॅक्टरीतील अन्य कामे करतात. थॉम्सन यांच्या पाचव्या पिढीतील निकोला थॉम्सन या ‘कुकाबूरा’चा कार्यभार सांभाळताहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये मानाचे स्थान असलेला ‘कुकाबूरा’ चेंडू बनविण्याचे कार्य याठिकाणी अहोरात्र सुरु आहे.

Exit mobile version