सरकारने मजुरांनाही फसवले

पाच महिन्यांपासून मजुरी नाही

। ठाणे । प्रतिनिधी ।

शहापूर तालुक्यात रोजगार हमी योजनेवर काम करणार्‍या सुमारे 25 हजार मजुरांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने या मजुरांनाही फसवल्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून मजुरीचा एक रुपयाही मिळालेला नाही. त्यांची 64 लाख 73 हजार रुपयांची मजुरी थकल्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबाचा गाडा ओढणे अवघड झाले आहे. मजुरीसाठी शेकडो मजूर दररोज रोजगार हमी योजनेच्या कार्यालयात येत आहेत. तिथे त्यांना निधी उपलब्ध नसल्याचे कारण सांगून पुन्हा पाठवले जात आहे. रोजगार हमी योजनेची मजुरी मिळत नसल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेकडो मजुरांनी आता रोजीरोटीच्या शोधात स्थलांतर सुरू केले आहे.

रस्ते तयार करणे, विहीर काढणे, तलावांचे गाळ काढणे, शौच खड्डे काढणे, घरकुल बांधकाम, भातशेती दुरुस्ती करणे, फळ बाग व वृक्ष लागवड करणे, बांबू लागवड करणे, संरक्षण भिंत बांधणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग आदी कामे ग्रामपंचायतमार्फत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून केली जात आहेत. या कामावर स्थानिक लोकांना मजूर म्हणून काम उपलब्ध करून दिले जात आहे. गाव पातळीवर ग्रामपंचायत स्तरावर ही कामे करताना शासकीय मजूर म्हणून मंजूर कुटुंबांना जॉब कार्डदेखील देण्यात आली आहेत. हीच कामे केलेल्या तालुक्यातील सुमारे 25 हजार मजुरांना गेल्या पाच महिन्यांपासून मजुरी देण्यात आलेली नाही.

Exit mobile version