कर्जतच्या भूमीने मला नाव दिले : डॉ. तासगावकर

हुतात्मा चौकात मध्यरात्री ध्वजवंदन

| नेरळ | वार्ताहर |

देशाच्या स्वातंत्र्यासाठी हुतात्म्यांचे बलिदान झालेल्या कर्जत तालुक्यात मला सर्व काही दिले आणि महत्त्वाचे म्हणजे नाव दिले. त्यामुळे कर्जत तालुक्याच्या सदैव ऋणात राहणार असल्याचे प्रतिपादन रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक डॉ. नंदकुमार तासगावकर यांनी केले. नेरळ येथील हुतात्मा चौकात मध्यरात्रीचे ध्वजारोहणप्रसंगी ते बोलत होते.

नेरळ येथील हुतात्मा चौकात 18 वर्षे देशाचा स्वातंत्र्यदिन मध्यरात्री बारा वाजून एक मिनिटांनी तिरंगा झेंडा फडकवून साजरा केला जातो. यावर्षी अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने मध्यरात्रीच्या ध्वजारोहणाआधी मशाल फेरी काढण्यात आली. विश्‍वजीत नाथ यांनी असंख्य तरुण यांच्यासोबत नेरळ गावातून मशाल फेरी काढली. त्यानंतर मध्यरात्रीनंतर डॉ. नंदकुमार तासगावकर यांच्या हस्ते ध्वज फडकाविला.

यावेळी नेरळ सरपंच उषा पारधी, उपसरपंच मंगेश म्हसकर, सदस्य प्रथमेश मोरे, धर्मानंद गायकवाड, सुप्रिया भगत, नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर, माजी उपसरपंच अंकुश शेळके, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत काळे, काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष संजय गवळी, भाजपचे तालुका सरचिटणी राजेश भगत, शिवसेना उपतालुकाप्रमुख अंकुश दाभने, डॉ. हेमंत शेवाळे, अ‍ॅड. अल्ताफ डोंगरे, अ‍ॅड. रमाकांत तरे, ऋषिकेश कांबळे, मातोश्री टिपणीस महाविद्यालयाचे प्रा. डॉ. नंदकुमार इंगळे, विद्या विकास मंदिरच्या मुख्याध्यापिका विनया काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी स्मारक समितीच्या वतीने सर्वांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत आणि मिठाई वाटून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी स्मारक समितीचे सदस्य तसेच नेरळ गावातील शेकडो तरुण तसेच विद्यार्थी आणि महिला उपस्थित होत्या.

Exit mobile version