महामानवाने भेटी दिलेल्या स्थळांच्या विकासाकडे दुर्लक्ष
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
महाड येथील क्रांती भूमीतील शाहू महाराज सभागृह नुतनीकरणासाठी 85 लाख रुपयांचा निधी नगरपरिषदेला वर्ग करण्यात आला. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतमुळे 2019 पासून विना वापर पडून असल्याची माहिती समोर आली आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेटी दिलेल्या ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळांचा विकास करण्याचा गाजावाजा शासनाने मोठ्या प्रमाणात केला. परंतु, महाडमधील शाहू महाराज सभागृह नुतनीकरणाचे काम अद्यापही लाल फितीत अडकून असल्याचे समोर आले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, राजकीय, व आर्थिक क्षेत्रातील योगदान व आधुनिक भारत घडविण्यामध्ये मोलाचा सहभाग राहिला आहे. त्यांच्या संघर्षाची समाजाला प्रेरणा मिळावी यासाठी शासनाने एक वेगळा उपक्रम हाती घेतला. महामानवाच्या 125 व्या जयंतीनिमित्त अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे, स्थळांचा विकास करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या स्थळांचा विकास करून तो परिसर पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या स्थळांच्या विकासासाठी निधी वितरीत करण्याचे परिपत्रक 24 मार्च 2017 मध्ये काढण्यात आले.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 मध्ये महाड येथील चवदार तळे येथे पाण्याच्या हक्कासाठी सत्याग्रह केला. त्यामुळे ही क्रांतीभूमी म्हणून ओळखले जाते. या सत्याग्रहाला 20 मार्च 2026 मध्ये 99 वर्षे पूर्ण होतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक स्थळांचा विकास करण्यासाठी महाड येथील क्रांती स्तंभ, शाहू महाराज सभागृह नूतनीकरण करण्यासाठी 13 मार्च 2020 मध्ये 85 लाख 17 हजार 730 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती समाजकल्याण विभागाकडून उपलब्ध झाली आहे. मात्र, हा निधी नूतनीकरणासाठी पुरेसा नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यावेळी 9 मार्च 2021 मध्ये समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. या निधीत दुरुस्ती करणे शक्य नसल्याचे तेथील मुख्याधिकारी यांनी सांगितले. स्ट्रक्चरल ऑडिट करून ही इमारत नव्याने बांधण्यात यावे, असे नमूद करण्यात आले. त्यानुसार नव्याने बांधकाम प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना नगरपरिषद मुख्याधिकारी व कार्यकारी अभियंता यांना देण्यात आल्या. मात्र, मुख्याधिकारी व कार्यकारी अभियंता यांनी तो प्रस्ताव अद्याप पाठविला नाही. याबाबत 2022 मध्ये महाडच्या मुख्याधिकारी यांना पत्र पाठविण्यात आले. नगरपरिषदेला वर्ग केलेला 85 लाख रुपयांचा निधी समर्पित करण्यात यावा, असेही पत्र मुख्याधिकारी यांना 3 नोव्हेंबर 2022 मध्ये पाठविण्यात आले आहे. परंतु, मुख्याधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे 2019 पासून 85 लाख 17 हजार 730 रुपयांचा निधी विना वापर पडून असल्याची माहिती समोर आली आहे. तो शासनाकडे तात्काळ जमा करण्यात यावा, यासाठी अनेक वेळा पत्रव्यवहार समाजकल्याण विभागाकडून करण्यात आले आहेत. एक ऑक्टोबर 2025 मध्ये पत्र देऊन मुख्याधिकारी यांना निधी समर्पित करण्याचे सूचित केले आहे. परंतु, अजूनपर्यंत हा निधी समर्पित करण्यात आला नाही. मागील चार वर्षांपासून महाड नगरपरिषदेवर प्रशासकीय राजवट आहे. मुख्याधिकारी यांच्यामार्फत नगरपरिषदेचा कारभार चालत होता. तरीदेखील महामानवाने भेटी दिलेल्या महाडमधील क्रांतीभूमीच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याने नाराजीचे उमटत आहेत.
वाढीव निधीचा प्रस्ताव तयार
महाड येथील क्रांतीभूमीतील शाहू महाराज सभागृह नूतनीकरणासाठी 85 लाख 17 हजार 730 रुपयांचा निधी महाड नगरपरिषदेला वर्ग करण्यात आला. मात्र, या निधीमध्ये दुरुस्ती करणे शक्य नसल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले. त्यानुसार जुना निधी समर्पित करण्यात यावा, असे मुख्याधिकारी यांना पत्र पाठविण्यात आले.नूतनीकरणाच्या कामासाठी एक कोटी 54 लाख नऊ हजार 696 रुपयांच्या वाढीव निधीचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. तो प्रस्ताव मुंबई येथील प्रादेशिक उपायुक्त यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.
चवदार तळ्याचे पाणी गढूळ
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्च 1927 मध्ये क्रांती करून हे पाणी सर्वसामान्यांना पिण्यासाठी खुले केले. त्यामुळे दरवर्षी वीस मार्चला लाखो अनुयायी या भूमीला भेट देतात. महाडमधील चवदार तळ्याचे पाण्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, हे पाणीच गढूळ असल्याची माहिती नगरपरिषदेकडून मिळाली आहे. या चवदार तळ्याच्या पाण्याचे शुध्दीकरण करण्याचे काम आता एमआयडीसीकडे दिले आहे. निविदा प्रक्रिया व त्यानंतर काम त्यामुळे यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायींना 20 मार्चला गढूळ पाण्यालाच स्पर्श करण्याची वेळ येणार आहे.
शाहू महाराज सभागृह नूतनीकरणासाठी वर्ग केलेला निधी शासनाला समर्पित करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपूर्वीच हा निधी वर्ग केला आहे. मात्र, कोणत्या दिवशी वर्ग केला हे निश्चित माहीत नाही.
धनंजय कोवळेकर
मुख्याधिकारी, महाड







