शासकीय कार्यालयातील लँडलाईन अडगळीत

संपर्कासाठी सर्वसामान्यांना अडचणीचा सामना

| पाली | वार्ताहर |

मोबाईलच्या वापरामुळे शासकीय कार्यालयातील असलेले जुने भारत संचार निगमची लँडलाईन सेवा अडगळीत गेली आहे. अनेकदा हे बंदच असल्याचे दिसून येते. त्यामुळे शासकीय कार्यालयात संपर्कासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र पाली शहरासह विविध विभागातील कार्यालयातून दिसून येत आहे.

यामुळेच शासकीय कार्यालयात एक स्वतंत्रपणे मोबाईल क्रमांक देण्यात येऊन त्याची माहिती सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवावी, अशी मागणी सुधागडातील नागरिकांकडून केली जात आहे. यासंदर्भात पाली एसटी स्थानक, तहसील कार्यलय, पोलीस ठाणे या प्रमुख नागरिकांच्या दैनंदिन कामकाजाच्या ठिकाणी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र येथील अत्यावश्यक सेवेप्रसंगी नागरिकांना संपर्क साधण्यासाठी डॉक्टरांच्या खासगी नंबरचा वापर करावा लागतो.

अनेक वेळा हे नंबर बंद असल्याने अथवा अत्यावश्यक शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर गेल्यास फोन उचलले जात नसल्याने नागरिकांना तातडीने संपर्क होऊ शकत नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेता शासनाने या प्रत्येक शासकीय कार्यालयात स्वतंत्रपणे दूरध्वनी यंत्रणेची व्यवस्था करावी व ते क्रमांक नागरिकांच्या माहितीस्तव जाहीर करावे, अशी मागणी सुधागड प्रेस क्लबने केली आहे.

या संदर्भात सुधागड प्रेस क्लब कार्याध्यक्ष रवींद्रनाथ ओव्हाळ यांनी स्पष्ट केले की, विविध शासकीय कार्यालयातील असलेल्या अधिकार्‍यांचे नंबर हे खासगी स्वरूपाचे असल्याने काही वेळा सायंकाळी उशिरा त्यांच्याशी संपर्क साधणे अडचणीचे ठरते. अशावेळी शासकीय क्रमांकावर संपर्क साधणे केव्हाही उचित ठरणार असल्याने शासनाने या बाबीचा विचार करावा.

Exit mobile version