रसायनीत कारागीर मग्न
| रसायनी | वार्ताहर |
अवघ्या दोन आठवड्यावर येऊन ठेपलेल्या गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तीचे रंगकाम अंतिम टप्यात आले असून, शहरासह ग्रामीण भागातही मूर्तिकार रंगकामात दिवस-रात्र मग्न असलेले पहावयास मिळत आहेत. यातच मोहोपाडा येथे पिढ्यान्पिढ्या आकर्षक गणेशमूर्ती बनविणारे मूर्तीकार मनोहर धोत्रे यांच्या कारखान्यात मूर्तींवर अखेरचा हात मारण्याची लगबग सुरू आहे.
गणेशमूर्तीवर अखेरचा हात फिरत असताना मूर्तीचा जीव असणारे डोळे, किरीट, त्रिशूल, गंडक आदीचे रंगकाम अंतिम टप्प्यात आले आहे. यामध्ये मूर्ती आकर्षक व रेखीव दिसण्यासाठी डोक्याच्या किरीटास सोनेरी, सिंहासनास फिकट गुलाबी, पाठीमागील आसनास लाल, हिरवा, पिवळा, केशरी आदी रंगांनी गणेशमूर्तीचा पुरवठा केला जात आहे. गणेशमूर्ती आकर्षक होण्यासाठी पर्ल कलर व चकमक यांची नवीन डिझाईन आहेत. त्यामुळे ग्राहकांचा या डिझाईनच्या गणेशमूर्ती खरेदी करण्याकडे कल आहे. घरगुती. पूजेच्या मूर्तीना खूप मागणी वाढली आहे. सध्या शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही गणेशोत्सवाची चाहूल लागल्याने गणेशमूर्ती रंगविण्याच्या व विक्री करण्याच्या कामाला अधिक वेग आल्याचे मोहोपाडा येथील मूर्तीकार मनोहर धोत्रे यांनी सांगितले.