। पुणे । प्रतिनिधी ।
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजितदादा पवार यांचे आज बुधवार (दि. 28) दुःखद निधन झाले आहे. बारामतीत झालेल्या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी बारामतीत मेडिकल कॉलेजबाहेर समर्थकांची गर्दी उसळली आहे. तर, संपूर्ण पवार कुटुंबही बारामतीत दाखल झाले आहेत. उद्या, 29 जानेवारी रोजी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
बारामती येथे विमानाचे लँडिग होत असताना अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की विमान जळून खाक झाले आहे. आज बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या चार सभा होणार होत्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचारासाठी या सभांचे आयोजन करण्यात आले होते. सुपे जिल्हा परिषद गटासाठीही एक सभा होणार होती. यासाठी अजित पवार विमानाने मुंबईहून बारामतीमध्ये आले होते. मात्र, विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, शरद पवारांसह संपूर्ण कुटुंब बारामतीत दाखल झालं असून उद्या, 29 जानेवारी रोजी अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अजितदादा पवार यांच्या पार्थिवावर उद्या होणार अंत्यसंस्कार
