नव्या आराखड्यानुसार उभारले जाणार आगार
। पनवेल । प्रतिनिधी ।
राज्य सरकारच्या एसटी महामंडळा तर्फे उभारण्यात येणार असलेल्या पनवेल एसटी आगाराचा आराखडा पुन्हा बदलण्यात आला आहे. 2018-19 ला सादर करण्यात आलेल्या आराखड्यात पनवेल पालिकेच्या नियोजन विभागाकडुन सुधारणा सुचवण्यात आल्याने व पालिकेच्या नियमात बदल झाल्याने जुना आराखडा बदलण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अधिकार्यांनी दिली. त्यामुळे आता नव्या आराखड्यानूसार आगाराची उभारणी करण्यात येणार आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या पनवेल येथील एसटी आगाराचा विकास सूरत आगाराच्या धर्तीवर कारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा नवीन डेपो उभारण्यासाठी 230 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शहरातील 17 हजार 500 चौरस मीटर भूखंडावर अद्ययावत बसस्थानक उभारण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. सुरवातीला आगाराचा विकास बांधा आणि वापरा या तत्वावर करण्यात येणार होता; मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने राबवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत आगाराच्या विकासासाठी पनवेल मास्क ट्रांझीट कंपनीच्या निविदेला 2018-19 दरम्यान मान्यता देण्यात आली होती. कंपनीसोबत करण्यात आलेल्या करारानुसार आगाराचा आरखडा तयार करून पुढील मान्यतेसाठी पनवेल पालिकेच्या बांधकाम विभागाकडे पाठवण्यात आला; मात्र आराखड्यात पालिकेच्या विभागाकडून अनेक दुरुस्त्या सुचवण्यात आल्या होत्या.
पालिकेकडुन आलेल्या सूचनेनुसार नवा आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी पाठविण्याच्या सूचना काही दिवसापूर्वी देण्यात आल्या होत्या. याबाबत एसटी महामंडळाचे अधिकारी, अभियंते व आगार विकसित करण्याचे काम देण्यात आलेल्या कंपनीच्या अधिकार्यांच्या बैठकीत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापिकीय संचालक शेखर चन्ने यांनी या सूचना केल्या होत्या. चेन्न यांनी केलेल्या सूचनेनुसार विकसक कंपनी तर्फे वेळेत नवा आराखडा सादर केला आहे. नव्या आराखड्यानुसार एसटी आगारात स्वतंत्र वाहनतळ, दोन तळघर, सीएनजी तसेच पेट्रोल पंप, बस डेपो उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
8.50 एफएसआयवर बांधकाम
एसटी आगाराच्या भूखंडावर उपलब्ध 8.50 एफएसआयवरील 50 एफएसआय भूखंडावर एसटी कार्यालय व व्यावसायिक बांधकाम केले जाणार असून, 50 टक्के एफएसआयवर बस स्थानकाचे बांधकाम करण्यात येणार आहे.