| पाताळगंगा | वार्ताहर |
सध्या उन्हाचा चटका जाणवायला प्रारंभ झाला असला तरी निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या वृक्ष हिरवेगार झाल्याचे पहावयास मिळत आहे. मात्र, तप्त उन्हात निसर्गाकडून सुरू असलेली रंगीबेरंगी फुलांची ही सृष्टी पाहून मनाला गारवा दिला जात आहे. निसर्गाच्या प्रकोपाने खचलेल्या बळीराजाला जणू जगण्याची नवी उमेद देण्यासाठी हा निसर्ग पुन्हा आपल्या आविष्काराची उधळण करत असल्याचा भास परिसरात ठिकठिकाणी अनुभवायला येत आहे.
एकीकडे सूर्य आग ओकत असताना झाडांना फुटणारी कोवळी पाने मनाला गारवा देऊन जात आहे. तप्त उन्हात, रूई, रिठा, कडूलिंब, आंबा, जांभूळ आदी झाडे पानाफुलांनी रंगून गेली आहेत. या झाडांवरील कोवळ्या पानांनी प्रत्येकाचे मन आकर्षिले जात आहे. ही चैत्राची उधळण बळीराजाला जगण्याची नवी उमेद देऊन जात आहे. ऋतुराजाच्या स्वागतासाठी निसर्ग श्रुंगार वाढवून सज्ज झाल्याचे चित्र पाताळगंगा परिसरात दिसत आहे.