। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील बेकरे गावात बिबट्याचा वावर असून सोमवारी बिबट्याने म्हशीवर हल्ला केल्याची घटना घडली. यामध्ये म्हैस जखमी झाली असून तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरातील शेतकर्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वन विभागाने याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
कर्जत तालुक्यात जंगली भागात पुन्हा एकदा हिंस्त्र प्राण्यांचे दर्शन होऊ लागले आहे. मागील महिन्यात शिरसे येथे बिबट्याच्या लहान पिल्लाचे दर्शन झाल्यानंतर मागील तीन दिवस आसल आणि बेकरे भागात बिबट्याचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, बिबट्या मानवी वस्तीत प्रवेश करीत असल्याने प्रामुख्याने बेकरे, जुम्मापट्टीच्या खाली अशा भागात ग्रामस्थांनी गस्ती घालण्यास सुरुवात केली आहे, तर वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा आणण्याची तयारी सुरु केली आहे.
कर्जत तालुक्यात आजही 25 टक्के क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. मागील काही वर्षात खांडस, अभेरपाडा, पाली, पोटल, हुमगांव या भागात बिबट्याने शेळी, मेंढी आणि गायी तसेच स्थानिक भागातील कुत्रे यांना शिकार केले आहे. मागील महिन्यात डिसेंबर महिन्यात कर्जत तालुक्यातील शिरसे भागात दोन दिवस बिबट्याच्या पिल्लाचे दर्शन ग्रामस्थांना झाले होते. मात्र गेल्या तीन चार दिवसात कर्जत तालुक्यात माथेरान डोंगराच्या खाली असलेल्या भागात दर्शन देत आहे. त्यामुळे त्या बिबट्याच्या दर्शनाने भीतीचे वातावरण पसरले आहे.
वन विभागाकडून सध्या सुरु असलेल्या प्राणी गणना करताना कर्जत पश्चिम विभागाचे वनरक्षक सुहास मगर यांना पहाटेच्या वेळी आसल भागाच्या मागे असलेल्या जंगलात बिबट्याचे दर्शन झाले. त्या बिबट्याच्या विष्ठा आणि पायाच्या ठसे वन विभाग यांच्याकडून ग्राह्य धरण्यात आले आहेत.त्या बिबट्याचे वयोमान साधारण दोन वर्षाचे असेल अशी माहिती वनक्षेत्रपाल निलेश भुजबळ यांनी दिली.त्यानंतर आसल भागातील बिबट्याचे दर्शन लक्षात घेऊन वन विभाग सतर्क झाले आहे. मात्र मागील दोन दिवस बेकरे भागाच्या मागे असलेल्या घनदाट जंगलात बिबट्याने आपले दर्शन दिले.परंतु त्या बिबट्याने मागील दोन दिवसात सहा कुत्रे यांना फस्त केले आहे.तर एक म्हैस आणि काही जनावरे यांना बिबट्याने जखमी केले आहे.त्यामुले बेकरे ग्रामस्थांनी त्या बिबट्यामुळे मानवी हानी होऊ नये, यासाठी रात्रीची गस्ती घालण्यास सुरुवात केली आहे.त्याचा फायदा 22 जानेवारीच्या रात्री ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे गावाच्या मानवी वस्तीत घुसण्याचा प्रयत्न करीत असलेल्या बिबट्याला ग्रामस्थांनी आरडाओरड केल्याने बिबटा पळून गेला अशी माहिती वन विभागाने दिली आहे.
अलिबाग येथील जिल्हा उपवन संरक्षक यांच्याकडे त्या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा नेण्याची परवानगी मागितली आहे. खालापूर आणि अलिबाग येथून पिंजरा आणण्याची तयारी केली आहे.तर ग्रामस्थांनी रात्रीची तसेच दिवसा गस्ती घालण्यास सुरुवात केली असून बिबटयाच्या भीतीने मानवी वस्तीत राहणारे लोक भयभीत झाले आहेत. या बिबट्यांनी मानवी वस्तीत घुसून कोणताही संहार करू नये, यासाठी सर्वाना आवाहन करणारे पत्र जारी केले आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात जखमी केलेल्या आणि मृत पावलेल्या जनावरांचे आर्थिक नुकसान वन विभाग देणार असून कोणत्याही शेतकर्यांनी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पक्षी प्राणी यांचे मांस खाऊ नये असे आवाहन केले आहे. त्या मांसमध्ये बिबट्याच्या दाताचे विष लागल्याची शक्यता असते आणि म्हणून शेतकर्यांसाठी वन विभाग कडून आवाहन करण्यात येत असल्याची माहिती कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी केले आहे.