। मुरूड । वार्ताहर ।
मुरूड खोरा बंदरात जेट्टीजवळ खडकाळ भागात रणरणत्या उन्हात अडकलेल्या लॉगहेड जातीचा समुद्री कासवाला सर्पमित्र संदीप घरत व सहकारी ऋषीकेश बैले यांनी समुद्रात सोडून जिवदान दिले आहे. सकाळच्या रणरणत्या उन्हात खडकात अडकुन निपचित पडून राहिलेल्या कासवाच्या पाठीवर समुद्राचे पाणी घालून संदीप घरतने दिलासा दिला.
मुरूड शहरापासून 1 किमी. अंतरावर असलेल्या खोरा बंदरात नेहमी प्रमाणे जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची वर्दळ सुरू होती. साधारण सकाळी 9 वाजता संदीप घरत व ऋषीकेश बैले हे खोरा बंदरात मासेमारी करीता गेले होते. त्यावेळी खोरा जेट्टीच्या खडकाळ भागात कासव दृष्टीस पडते. ते कासव जिवंत असल्याचे लक्षात आले. त्यावेळी तात्काळ संदीप घरत कासवाजवळ पोहोचले तर तो कासव रणरणत्या उन्हात तापून कोरडा झाला होता व असह्य होऊन निपचित पडला होता. त्यावेळी जवळ असलेले समुद्राचे पाणी कासवाच्या पाठीवर टाकल्याने त्याला दिलासा मिळाला व कासवाची हालचाल सुरू झाली.
संदिप घरतने त्यावेळी त्याच परिसरात मासे पकडत असलेल्या त्यांचे मित्र ऋषीकेश बैले याला तात्काळ फोन करुन मदतीसाठी बोलावले. नंतर दोघांनी मिळून या कासवाला समुद्रात सुखरूप सोडून दिले. दरम्यान हे कासव मादी जातीचे होते. अंडी घालण्यासाठी किनार्यावर आले होते. पाण्याच्या लाटेने खडकात अडकले होते. ते 3.5 फुट लांब व 2.5 फुट रुंदीचे असे सुमारे 40 की वजनाचे होते असे सर्पमित्र संदीप घरत यांनी सांगितले.