| सुधागड-पाली | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील पडसरे गावाला जोडणारा पुल अक्षरशः मोडकळीस आला असून, धोकादायक अवस्थेत आहे. हा पुल पडसरे गावासह येथील आदिवासी आश्रमशाळेला सुधागड तालुक्यातील सर्व गावांशी जोडतो. परिणामी पडसरे आश्रमशाळेतील शेकडो विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, येणारे पर्यटक व ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे.
या पुलाचा वापर पडसरे, लोळगेवाडी, एकलघर, महागाव, देउळवाडी, कवेलेवाडी, कोंडक आदिवासीवाडी, भोप्याचीवाडी, गोमाशी आदिवासीवाडी इत्यादी गावांतील नागरीक करतात. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येणारे पर्यटक देखील या पुलाचाच वापर करतात. या पूला खालूनच धबधब्याचे पांढरे खळखळणारे पाणी वाहते. या मार्गावर वाहनांची नागरिकांची देखील रेलचेल सुरु असते. पडसरे आदिवासी आश्रमशाळेत देखील मोठ्या संख्येने विद्यार्थी येत असतात. त्यामुळे येथील रस्ते व नदी पुल सुस्थितीत व सुरक्षित असणे गरजेचे आहे. परंतु, या पुलाचे संरक्षण कठडे तुटलेल्या अवस्थेत आहेत. संरक्षक कठड्याच्या लोखंडी सळ्या बाहेर निघाल्या आहेत. परिणामी वाहने व पादाचारी पुलाखाली कोसळून अपघाताची शक्यता आहे. याशिवाय पुलाच्या खालील स्लॅब जीर्ण झाला असून, स्लॅबच्या सळ्या देखील बाहेर निघाल्या आहेत. एप्रिल 2018 साली या पडसरे पुलाची व येथील प्रसिद्ध अशा धबधब्याची तत्कालीन रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी पाहणी केली होती. व त्यांनी पुल दुरुस्ती बाबत संबंधित विभागाला तात्काळ सूचना दिल्या जातील, असे सांगितले होते. मात्र, आजतागायत या पुलाची कोणतीच डागडुजी केली गेलेली नाही. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने पडसरे पुलाची तत्काळ दुरुस्ती करावी व सर्वांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व पर्यटकांनी केली आहे.







