अपघातग्रस्तांची जीवनवाहिनी आजही कागदावरच

ट्रॉमा केअर सेंटरला मुहूर्त कधी?

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव ट्रॉमा केअर सेंटरला मंजुरी मिळाल्यामुळे रुग्णालयाच्या आधुनिकीकरणाच्या वाटचालीत आणखी एक भर पडणार असून, माणगावची आरोग्य यंत्रणा ट्रॉमा केअर सेंटरमुळे अधिक बळकट होणार आहे. या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये रस्त्यावरील अपघातग्रस्त रुग्णावर तातडीने उपचार होऊन त्यांचे प्राण वाचणार आहेत. मात्र, या ट्रॉमा केअर सेंटरला सहा महिन्यांपूर्वी मंजुरी मिळाली असून, ते आजही कागदावरच राहिले आहे. या ट्रॉमा केअर सेंटर उभारणीला मुहूर्त कधी सापडणार, हा प्रश्‍नच विचारला जात आहे.

माणगाव येथील 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय हे विविध रुग्णांच्या आजारावर व शस्त्रक्रियेसाठी सज्ज आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातग्रस्तांवर उपचार करण्यासाठी सिटीस्कॅन मशीनची गरज आहे. त्याचबरोबर ट्रॉमा केअर सेंटरचीही फार मोठी गरज भासत होती. महामार्गावरील हे महत्त्वाचे ठिकाण असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, मंडणगड, दापोली तसेच विविध तालुक्यातून रुग्ण उपचारासाठी येथे येतात. शिवाय, दक्षिण रायगडमधील पोलादपूर, महाड, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, रोहा, तळा, पाली येथूनही रुग्ण उपचारासाठी मोठ्या प्रमाणात येतात. ट्रॉमा केअर सेंटर व सिटीस्कॅन मशीन कार्यान्वित झाल्यास माणगावात रुग्णावर निदान व उपचार होऊन त्या रुग्णांचे प्राण वाचून जीवदान मिळेल, अशी अशा नागरिकांना वाटत आहे. माणगाव उपजिल्हा रूग्णालयालगत हे ट्रॉमा केअर सेंटर उभारले जाणार असून, तेथे 25 ते 30 खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे, असे शासनाने सहा महिन्यांपूर्वी जाहीर केले होते. या ठिकाणी अस्थिरोग तज्ज्ञ व त्याला लागणार पुरेसा कर्मचारी वर्ग, एक्सरे सुविधा, हाडाचे ऑपरेशन करण्यासाठी सुविधा असणार आहे. याच रुग्णालयात ऑक्सिजन प्लँट उभारल्यामुळे रुग्णांना याचाही लाभ होत आहे.

कोकण रेल्वे, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, पुणे-ताम्हिणी-माणगाव-दिघी हा राष्ट्रीय महामार्ग, रेवस-रेड्डी सागरी महामार्ग अशा महत्त्वाच्या वाहतुकीचे केंद्र म्हणून माणगाव तालुका महत्त्वाचा आहे. जिल्ह्यातील औद्योगिकीकरण व पर्यटन यामुळे या भागातील नागरिकीकरणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वाहतुकीदरम्यान होणारे रस्ते अपघात, औद्योगिक क्षेत्रातील अपघात, महापूर, चक्रिवादळे यांसारख्या नैसर्गिक आपत्ती यांचे प्रमाणही अलिकडच्या काळात वाढत असल्याचे दिसून येते. वातावरणीय बदलांमुळे उद्भवणारी आपत्कालीन परिस्थिती, रस्ते अपघाताप्रसंगी रुग्णांच्या बचावासाठी अतिमहत्त्वाच्या कालावधीत अत्यावश्यक आरोग्यसेवा मिळण्यासाठी ट्रॉमा केअर युनिट जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी कार्यरत असणे गरजेचे आहे. त्यासाठी माणगाव येथे ट्रॉमा केअर युनिट उपलब्ध होण्यासाठी माजी पालकमंत्री अदिती तटकरे यांनी महाविकास आघाडी सरकारकडे मागणी केली होती.

Exit mobile version