फॅशन शोच्या रँपवर अवतरणार छोट्यांची किलबिल

दिव्यांग मुलेसुद्धा करणार रॅम्प वॉक
। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल स्मार्ट मम्मीज अर्थात पीएसएम या पनवेलमधील सेवाभावी संस्थेच्या वतीने रविवार, दि. 17 एप्रिल रोजी सायंकाळी लहान मुलांसाठी फॅशन शोचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या फॅशन शोमध्ये दिव्यांग मुलेदेखील सहभागी होणार आहेत. शारीरिक कमतरतेवर मात करीत त्यांच्या ठायी विजिगीषू वृत्ती जागृत व्हावी या उद्देशाने दिव्यांग मुलांचा रॅम्प वॉक आयोजित करत असल्याचे पीएसएमच्या संस्थापिका शीतल ठक्कर यांनी सांगितले.
रविवारी होणार्‍या फॅशन शोची पूर्वतयारी म्हणून गुरुवारी 14 एप्रिल रोजी सराव सत्राचे आयोजन करण्यात आले होते. हा फॅशन शो पनवेलच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे. आयोजनाबाबत अधिक माहिती देताना कविता ठाकूर यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले की, मुलांच्यात आत्मविश्‍वास वाढीस लागावा हा आमचा आयोजनापाठचा मूळ हेतू आहे; परंतु दिव्यांग मुले हीदेखील कुठल्याही क्षेत्रात कमी नसतात, हा सामाजिक संदेश देण्याचा आमचा हा प्रामाणिक प्रयत्न असेल. तर संस्थापिका शीतल ठक्कर म्हणाल्या की, कोरोना विषाणूच्या आक्रमणामुळे जवळपास गेली दोन वर्षे मुलांच्या कुठल्याही अ‍ॅक्टिव्हिटीज होत नव्हत्या. शिक्षण, मनोरंजन, शारीरिक अभ्यासक्रम या सगळ्यांसाठी त्यांना ऑनलाईन माध्यमातून सामोरे जावे लागत होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी एकत्र यावं आणि फॅशन शोमध्ये सहभागी व्हावं असं आम्हाला वाटलं. या कार्यक्रमाला जे.एम. म्हात्रे, विक्रांत पाटील, दिलीप पाटील, शुभांगी घरत, डॉ. कल्पना शेट्टे यांची उपस्थिती असणार आहे.

Exit mobile version