विठ्ठल नामाच्या गजरात चिमुकल्याची निघाली दिंडी…

चोरढे शाळेचा अभिनव उपक्रम

। चणेरा । प्रतिनिधी ।

शालेय विद्यार्थीमध्ये लहान वयातच भक्तिभावाची भावना वाढीस लागावी, मुलांना मोबाईलपासून दूर करून भक्तिमार्गात आणावे तसेच त्यांचे आभ्यासाकडे लक्ष वळवावे या उदात्त हेतूने चोरढे शाळेतील शिक्षकांसह शाळा व्यवस्थापन समितीने चोरढे गावातून दिंडी काढली होती.

मुरुड तालुक्यातील चोरढे रायगड जिल्हा परिषद शाळेत दही हंडी उत्सव, ग्राम स्वच्छता, रक्षाबंधन लोकसहभाग, वृक्षारोपण असे विविध उपक्रम शाळा राबवत असते. सन 2023-2024 ची मुख्यमंत्री ‘माझी शाळा, आदर्श शाळा’ या योजनेत शाळेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. आषाढी एकादशीला विविध वारकरी दिंडीला जात असतात. त्याच्या सहकार्याने दिंडीचे आयोजन केले होते.

विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठला हरी नाम विठ्ठला, हरी ओम् विठ्ठला, ज्ञानोबा माऊली तुकाराम आशा विविध जयघोषाने संपूर्ण चोरढे गाव दुमदुमूला. विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून गावच्या सरपंच तृप्ती घाग, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश तांबडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थिती होते.गावातील भजनी मंडळ, ग्रामस्थ, पालक, वारकरी यांनी मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी शोभा पंची यांनी 10 किलो फरसाण व केसरीनाथ आंबलीकर यांनी विद्यार्थ्यांसाठी 64 टोप्या दिल्या. तसेच देवांश चोरढेकर यांनी पालखीची सजावट केली. शाळेपासून दिंडीला सुरुवात झाली. ढोलकी व टाळांच्या गजरात गावातील लोकांच्या जनसमुदात संपूर्ण गावात फिरून आल्यावर चोरढे एसटी थाबा येथे दिंडीची सांगता करण्यात आली. उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका संगीता भगत, विजय जाधव, रमेश सुभेदार, राजेंद्र नाईक, प्रतिभा वर्तक, जयश्री पंची यांनी योग्य नियोजन केले. गट शिक्षणाधिकारी सुनील गवळी यांनी उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

Exit mobile version