| सुतारवाडी | प्रतिनिधी |
सुतारवाडी नाक्यावर रस्त्याच्या मधोमध मोकाट गुरं मोठ्या प्रमाणावर घोळक्यांनी उभी राहत असतात. त्यामुळे लहान मोठ्या वाहनांना मोठा त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. कोलाडपासून सुतारवाडी मार्गे पुणेकडे जाण्यासाठी 110 की.मी. अंतराचा रस्ता असल्यामुळे त्याचप्रमाणे विले भागड या परिसरात अनेक कंपन्या कार्यरत असल्यामुळे अवजड सामान घेऊन अनेक ट्रेलर या मार्गावरून सातत्याने धावत असतात. विले भागाड येथील कंपन्यांमध्ये कच्चामाल देऊन झाल्यानंतर परतीचा प्रवास करत असताना अनेक ट्रेलरचालक वेगाने वाहन चालवत असतात. अशावेळी रस्त्याच्या मधोमध विश्रांती घेत असलेल्या गुरांच्यामधून वाट काढणे कठीण होते. रात्रीच्या वेळी अशा उनाड गुरांना उडवून जाण्याचे प्रकार अनेक वेळा या परिसरात घडलेले आहेत. तसेच, रात्रीच्या वेळी या उनाड गुरांना गुंगीचे इंजेक्शन देऊन टेम्पोत भरून त्यांना विक्रीसाठी नेण्याचे प्रकारे देखील घडत आहेत. तरीसुद्धा गुरांचे मालक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.







