| उरण | वार्ताहर |
उरण येथील हरवलेली मुलगी मुस्कान नवनीत चौधरी (13) हिचा मागील दहा ते पंधरा दिवसापासून उरण पोलीसांनी सखोल तपास केला. दि.4 रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मुस्कानच्या आईच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबर वरून फोन आला व त्यांनी मुस्कानची थोडक्यात माहिती घेतली व फोन कट केला.
मुस्कानच्या आई-वडिलांनी पोलीस प्रशासनाला संपर्क करून फोन केलेल्या व्यक्तीचा नंबर दिला. त्या नंबरची माहिती पोलिसांनी घेतली त्यावेळी सदरचा नंबर जळगाव येथील असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन जळगाव येथे रवाना झाले. सदर ठिकाणी पोलीस गेले असता मुलगी मुस्कान चौधरी ही एका बालकाश्रमात मिळून आली. मुस्कान ही तिचे आई वडील रागावल्याने वृंदावन, मथुरा उत्तर प्रदेश येथे रेल्वेने जात होती. त्यावेळी रेल्वे पोलिसांनी मुस्कान एकटी दिसल्याने तिला भुसावळ रेल्वे जंक्शन येथून ताब्यात घेऊन जळगाव मधील बालकाश्रमामध्ये दाखल केल्याचे उरणच्या पोलिसांना समजले.
मुस्कान चौधरी ही सुखरूप तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम उरण पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुरज कांबळे तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोलीस हवालदार बलदेव अधिकारी, पोलीस शिपाई रियाज शेख, महिला पोलीस शिपाई वैशाली पाटील यांनी सदरचा गुन्हा तपासून मुलीचा शोध यशस्वीपणे घेतला आहे.





