| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण निवडणूक यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे, अशी माहिती तालुक्याचे मुख्य निवडणूक अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी दिली. निवडणूक कार्यक्रमानुसार 21 जानेवारी ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती. त्यानंतर 22 जानेवारी रोजी अर्जांची छाननी, तर 27 जानेवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.
खुटवड यांनी सांगितले की, रोहा तालुक्यातील 4 जिल्हा परिषद मतदारसंघ व 8 पंचायत समिती मतदारसंघांसाठी अर्ज छाननी नंतर एकूण 99 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सर्व उमेदवारांना निवडणूक खर्चाबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या असून, खर्चाची मर्यादा 6 लाख व 4 लाख 50 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांनी दैनंदिन खर्चाचा तपशील नियमितपणे सादर करणे बंधनकारक आहे. आचारसंहितेच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यावर भर देण्यात आला असून, मतदारांना कोणतेही प्रलोभन देऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी तालुक्यात 3 ठिकाणी स्थिर पथके तसेच फिरती पथके नेमण्यात आली आहेत. प्रचार सुरू झाल्यानंतर व्हिडिओ सर्व्हेलन्स पथके कार्यरत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आचारसंहितेचे उल्लंघन कुठे झाल्याचे जनतेच्या निदर्शनास आल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा. संबंधित ठिकाणी पथक पाठवून तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे खुटवड यांनी स्पष्ट केले.






