कर्जतची खुशी हजारे गाजतेय
| नेरळ | प्रतिनिधी |
बहुचर्चित वेड हा चित्रपट प्रदर्शित झाला असून होऊन अवघ्या सहा दिवसात या चित्रपटाने सर्व उच्चांक मोडले आहेत. या चित्रपटात रितेश -जेनेलिया यांच्या जोडोसोबत चिमुरडी देखील गाजत असून ती चिमुरडी कर्जतची खुशी हजारे ही बाल कलाकार आहे.
चित्रपटातील रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्या अभिनयाचं मोठं कौतुक होत आहे. मात्र या सर्वांमध्ये चित्रपटाच्या नायक नायिकेचे आयुष्य बदलून टाकणार्या बालकलाकाराने देखील जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतलेली पाहायला मिळत आहे. या मुलीच्या येण्यानेच चित्रपटाला खरा ट्विस्ट येतो. या मुलीमुळेच सत्या आणि श्रावणी एकत्र आलेले पाहायला मिळतात. त्यामुळे ही भूमिका चित्रपटात खूप महत्वाची मानली जाते.
ही भूमिका महत्वाची साकारणार्या बालकलाकाराचे नाव आहे खुशी हजारे. खुशीने या चित्रपटात खूप छान काम केले आहे. त्यामुळे तिच्या जबरदस्त अभिनयाचं देखील कौतुक होत आहे. खुशी हजारे हिने यापूर्वी हिंदी मराठी चित्रपटातून चाईल्ड आर्टिस्ट म्हणून काम केलेले आहे. वजनदार, प्रवास, सरबजीत, भूत, आपडी थापडी अशा चित्रपटातून तिला विकी कौशल, ऐश्वर्या राय, श्रेयस तळपदे, अशोक सराफ, पद्मिनी कोल्हापूरे, सई ताम्हणकर या मोठमोठ्या सेलिब्रिटींसोबत काम करण्याची संधी मिळाली. वेड चित्रपटामुळे चिमुरडी खुशी हजारे पुन्हा अशोक मामांसोबत काम करताना दिसली. प्रवास चित्रपटामुळे झालेली मैत्री या चित्रपटातून अधिकच घट्ट बनली. तर सेटवर जेनेलिया सोबत देखील तिचे सूर चांगलेच जुळून आले होते.
मान्यवरांचा सहवास
रितेश आणि जेनेलियाच्या अभिनयाला तोडीसतोड खुशीने देखील चित्रपटातील तिने तिचा अभिनव अगदी चोख बजावले आहे. त्यामुळे खुशीचे देखील सर्वत्र कौतुक केले जात आहे. ज्यांनी वेड हा चित्रपट पहिला असेल त्यांना ह्या मुलीचा अभिनय खूप आवडला देखील असेल. या पूर्वी देखील खुशीने उत्तम अभिनय केलेला पाहायला मिळाला आहे. विकी कौशल, ऐश्वर्या राय, श्रेयस तळपदे, अशोक सराफ, पद्मिनी कोल्हापूरे, सई ताम्हणकर अश्या तगड्या कलाकारांसोबत झळकलेल्या खुशीची वेडचित्रपटातील अभिनया बद्दल चर्चा होत असून ही बालकलाकार कर्जत शहरातील भिसे गाव येथील राहणारी आहे.