| रसायनी | प्रतिनिधी |
वासांबे जिल्हा परिषद गटात महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांनी मोठ्या उत्साहात व जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज अधिकृतरीत्या दाखल केले. या शक्तिप्रदर्शनामुळे संपूर्ण वासांबे परिसर निवडणूकमय वातावरणाने भारावून गेला.
महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), उबाठा शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष, मनसे तसेच वंचित बहुजन आघाडी या घटक पक्षांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महाविकास आघाडीचे उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शेकडो चारचाकी वाहनांचा भव्य ताफा काढत वासांबे परिसरात प्रभावी शक्तिप्रदर्शन केले. यावेळी नवसाला पावणारी टाकेदेवी माता येथे खोबऱ्याने ओटी भरून येणाऱ्या निवडणुकीत विजयासाठी देवीकडे साकडे घालण्यात आले व आशीर्वाद घेण्यात आला. यानंतर वाहनांचा ताफा खालापूरच्या दिशेने रवाना झाला. खालापूर फाटा येथून ढोल-ताशांच्या गजरात उमेदवार व कार्यकर्ते पंचायत समिती कार्यालयात दाखल झाले. यावेळी परिसरात उत्साहाचे व जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमास आमदार अनिकेत तटकरे, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, उबाठा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावत, खालापूर तालुका अध्यक्ष एकनाथ पिगळे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी वासांबे जिल्हा परिषद सदस्य पदासाठी संदीप सुदाम मुंढे, वासांबे पंचायत समिती सदस्य पदासाठी रोशन राऊत, तर रिस पंचायत समिती सदस्य पदासाठी निखिल नरेंद्र डवळे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपले उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केले. महाविकास आघाडी एकजुटीने निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने वासांबे गटातील राजकीय वातावरण तापले असून, येणारी निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.






