महाविकास आघाडी कायम, महायुती तुटणार

शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांचे प्रतिपादन


। पेण । प्रतिनिधी ।

भविष्यात महायुती तुटल्याशिवाय राहणार नाही. मात्र महाविकास आघाडी कायम राहणार आहे. आपण महाविकास आघाडीसोबत, शरद पवार यांच्या बरोबर राहणार आहोत. आजच आपण आपल्या जागा निश्‍चित केल्या नाहीत. परंतु ज्या आपल्या परंपरागत जागा आहेत, त्या आपण निश्‍चित आपल्याकडे घेणार आहोत. महाविकास आघाडीतील तीन पक्षांचे प्रमुख जागा वाटपासंदर्भात सामंजस्याने वाटाघाटी करत आहेत. तर महायुतीमध्ये दररोज अजित पवार नवनवीन वक्तव्य करत आहेत. त्यामुळे महायुती तुटणारच. तसेच नजीकच्या काळात पुन्हा एकदा आपण विधान परिषदेच्या वरिष्ठ सभागृहात असणार अशा प्रकारच्या व्युहरचनादेखील सुरू असल्याचे प्रतिपादन शेकापचे सरचिटणीस माजी आ. जयंत पाटील यांनी केले आहे.

पेण येथील शेतकरी कामगार पक्षाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन बुधवारी (दि.23)संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा तालुका चिटणीस महादेव दिवेकर, सुरेश खैरे, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, पी.डी.पाटील, सुप्रिया पाटील, शंकरराव म्हसकर, पनवेल नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, राजेश कोरडे, राजेंद्र सानप, प्रल्हाद पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यापुढे जयंत पाटील म्हणाले की, शेतकरी कामगार पक्षाचे नेते पक्ष सोडून जातात. परंतु कार्यकर्ते कधीच पक्षापासून दूर जात नाहीत. आजच्या उपस्थितीवरून हेच अधोरेखित होत आहे. तसेच अतुल म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर केली नसली तरी अतुल म्हात्रे पक्षाच्या वरिष्ठ पक्ष संघटनेत काम करताना आपल्याला दिसणार आहेत. त्याची इच्छा नसतानादेखील मी त्याना पेणमध्ये आणले आहे, तेही सर्वसामान्य पेणकरांच्या हितासाठीच. पेणमध्ये कमीत कमी 150 बिल्डर तो तयार करणार आहे. आता येणार्‍या एमएमआरडीए, नैना या प्रकल्पांसाठी अतुल म्हात्रे सारखाच माहितगार व उच्चशिक्षित माणूस पेणकरांना हवा आहे, असेही त्यांनी सांगितले. शेवटी जयंत पाटील यांनी पंढरपूर येथील शेतकरी कामगार पक्षाच्या अधिवेशनासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. तर येणार्‍या विधानसभेला पेणमध्ये शेतकरी कामगार पक्षाचाच आमदार असेल असे ठाम मत अतुल म्हात्रे यांनी मांडले.

Exit mobile version