महाड पूरपरिस्थिती … क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले माणगावकर नेहमीप्रमाणे प्रसंगात मदतीसाठी धावले

माणगाव | सलीम शेख |         

महाड शहर परिसरासह तालुक्यात दि.२२ जुलै रोजी जोरदार अतिवृष्टी होऊन सावित्री, काळ आणि गांधारी नद्यांचे पाणी घरांतून आणि दुकानांमधून शिरून गंभीर पूरपरिस्थिती निर्माण होऊन क्षणार्धात महाड वासियांचे होत्याचे नव्हते झाले. अनेकांचे संसार या पुराच्या पाण्यात वाहून गेले.  या प्रसंगात महाड वासियांच्या मदतीला आपल्या स्वभाव गुणधर्माप्रमाणे नेहमीप्रमाणे  माणगावकर मिळेल ती मदत घेवून धावले.याकामी लोकप्रतिनिधी,व्यापारी,प्रशासन, सामाजिक संस्था ,संघटना,दानशूर व्यक्ती यांच्याबरोबरच अनेक गावांनी घराघरांतून फिरून निधी गोळा करून पूरग्रस्तांना जीवनावश्यक सर्वच प्रकारच्या वस्तूंची भरभरून मदत दिली.प्रसंगी २२ जुलै रोजी पुराच्या पाण्यात अडकलेल्यांची सुटका होण्यासाठी पोलीस यंत्रणा व एनडीआरएफच्या टिमशी संपर्क साधण्यातही माणगावकर मागे पडले नाहीत.

ज्याप्रमाणे महाड वासियांनी ती रात्र जागून काढली त्याप्रमाणे आपला शेजारील तालुका संकटात आहे हे बघून माणगावकरांनी त्यांच्य मदतीकरीता रात्र जागून काढली.माणगावमधील अनेकांचे सगे सोयरे मित्रमंडळी महाडला असल्याने त्यातच आपला शेजारील तालुका  बघून माणगाव वासियांना कधी एकदा पुराचा पाणी ओसरतोय व आम्ही आपल्या बांधवांना  मदत करतोय असे माणगावकरांना वाटत होते.पुराचे पाणी महाडात शिरल्यावर वीजपुरवठा खंडित होऊन सर्वांचेच मोबाईल बंद पडल्याने कोणालाच त्याठिकाणी संपर्क साधता येते नव्हता.ती रात्रच महाडकरांसाठी वैऱ्याची होती.काही एक दुसऱ्याचे फोन थोड्या अवधीसाठी लागल्यावर त्यांनी आमची सुटका करा ,एनडीआरएफच्या टिमला कळवा,आम्हाला मदत करा अशी आर्त हाक दिली.तर काहींनी मोबाईलवरून हंबरडा फोडला.आम्हाला यातून वाचवा हीच आर्त हाक साऱ्यांची होती.पण निसर्गाच्या पुढे कोणाचे चालेना.

प्रत्येकजण देवाचरणी , अल्लाहचरणी महाड वासियांसाठी प्रार्थना व दुआ करीत होता.माणगावकर  हे नेहमीच प्रसंगात धावून जातात.कोठे अपघात झाला तर तर त्यातील अपघातग्रस्तांना मदतीचा हात देतात तर  नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास माणगावकर कधीच मदतीच्या बाबतीत मागे पडलेले नाहीत.मदतीचा स्वभावगुण हा खरोखरच माणगावकरांकडे कौतुकास्पद आहे. सारीच यंत्रणा माणगावमधील मदतीसाठी धावत असते. महाड शहरवासियांसह दरड कोसळल्यावर तालुक्यातील तळीये गावाला माणगावकरांनी भेट देवून तेथील बांधवांना मदत देवून त्यांना धीर दिला.माणगावात रायगड पोलीस दलातर्फे माणगाव पोलिस ठाणे यांनी मदत केंद्र सुरु केले.

तसेच तहसील कार्यालय माणगाव याठिकाणी मदत स्वीकारण्यात येवून ती महाड व तालुक्यातील पूरग्रस्तांना पोहचविण्यात येत आहे.माणगावकर एवढ्यावरच थांबले नसून महाडमध्ये जाऊन आपल्या सगेसोयरे यांच्या तसेच मित्रपरिवाराच्या घरात शिरलेले पाणी व चिखल काढण्यासाठी मदतीला गेले.काही माणगावकरांनी अन्नधान्याचे किट तर अनेकांनी जेवण,बिर्याणी,पुलाव बनवून त्यांचे पॅकेट करून पूरग्रस्तांना दिले.माणगाव तालुक्यासह जिल्ह्यातून तसेच जिल्हा बाहेरूनही महाड पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू असून राज्यातील दानशूर व्यक्ती,संस्था ,संघटनांनी अजूनही महाडकरांना मदत करून त्यांचे अश्रू पुसून त्यांना धीर देण्याची गरज आहे.

Exit mobile version