। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करा. महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढवित असून ही निवडणूक आगामी निवडणूकांसाठी दिशादर्शक ठरणार आहे. दुसर्याचे मत कसे मिळेल यासाठी प्रयत्न करुन सकाळी 10 वाजण्यापूर्वीच मतदान पूर्ण करण्याचे आवाहन शेकाप जिल्हा चिटणीस अॅड आस्वाद पाटील यांनी बुधवारी ( 26 एप्रिल) केले.
अलिबाग तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीची बैठक पीएनपी कॉलेजच्या सभागृहात पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी आ. पंडित पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, शेकापक्षाचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, नृपाल पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भास्कर चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य द्वारकानाथ नाईक, चित्रा पाटील, माजी सभापती जनार्दन पाटील, प्रमोद ठाकूर, तालुका चिटणीस अनिल पाटील, अलिबाग मुरुड मतदार संघ विभागीय चिटणीस संदीप घरत, संजय पाटील, नंदकुमार मयेकर, शिवसेना शहरप्रमुख संदीप पालकर, अॅड किशोर हजारे, अॅड परेश देशमुख, अॅड सचिन देशमुख, अजय झुंजारराव, जगदीश कवळे आदी उपस्थित होते.
अॅड आस्वाद पाटील पुढे म्हणाले की, जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिनविरोध विजय मिळवले आहेत. खरे तर छाननीमध्ये विरोधकांचे अर्ज बाद ठरल्याने संपूर्ण निवडणूक बिनविरोध झाली होती. मात्र सत्तेचा वापर करुन दबावामुळे अवैध अर्ज पुन्हा वैध ठरविण्यात आल्याने ही निवडणूक होत आहे. प्रत्येक मतदाराने आपले आधार कार्ड सोबत घेऊन मतदानासाठी वेळेवर उपस्थित राहून मतदना करा असेही त्यांनी यावेळी सांगितले. मतदानासाठी घेण्यात येणार्या खबरदारीच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. कृषी उत्पन्न बाजार समिती आपली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत एकत्रितरित्या ही निवडणूक लढवायची आहे. त्याचा परिणाम पुढील निवडणुकांमध्ये करता येईल,असे आवाहनही यावेळी करण्यात आले. माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील यांनी आभार मानले.