ओला चालकाकडून अडीच लाखांचा ऐवज जप्त
| पनवेल | वार्ताहर |
वयोवृध्द महिलांचा पाठलाग करून जबरी चोरी करणार्या सराईत गुन्हेगारास मुंब्रा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून अडीच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दिवा शहर परिसरात वयोवृध्द महिलांना टार्गेट करून त्यांचा पाठलाग करून सदर महिला राहत्या इमारतीमध्ये जिन्याने घरी जात असताना अनोळखी आरोपी हा त्यांच्या गळयातील सोन्याचे दागिने जबरीने खेचून पळून जात होता. अशाप्रकारचे 10 ते 12 दिवसांमध्ये 4 चोरीच्या घटना घडल्याने सदर गुन्हेगारास अटक करून चेन स्नॅचिंग गुन्हयांना प्रतिबंध करणे व घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान मुंब्रा पोलीसांसमोर होते.
मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. बी. कोल्हटकर यांनी गुन्हयांच्या घटनास्थळी भेट देवून सदर गुन्हे उघडकीस आणण्याकरीता मुंब्रा व दिवा गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनि शेळके, बोरसे व अमंलदार यांची दोन पथके तयार करून गुन्हेगाराची गुन्हे करण्याची पध्दत, गुन्हे करण्यासाठी वापरलेले वाहन तसेच इतर तांत्रिक व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आरोपी निष्पन्न करून त्यास अटक करणेबाबत वेळोवेळी मार्गदर्शन व पाठपुरावा केला. सदर पथकांनी 4 चेन जबरी चोरीचे गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याकरिता अविरत परिश्रम करून दिवा, खर्डीगाव, मुंब्रा व शिळफाटा परिसरातील सुमारे 110 खाजगी व महानगरपालिकेचे सी.सी.टी.व्ही. कॅमेर्यांचे फुटेज संकलन केले. सदर सी.सी.टी.व्ही फुटेजचे बारकाईने निरीक्षण करून आरोपीने गुन्हयात वापरलेली मोटारसायकल व त्याचा जाण्या-येण्याचा मार्ग निष्पन्न केला. सदरचा आरोपी हा गुन्हे करून खर्डी गाव परीसरात जात असल्याचे आढळून आल्याने नमुद पथकांनी अहोरात्र सापळा लावून आरोपीस निर्मलनगरी खर्डी गाव येथून शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेतले. कमलेश रामानंद गुप्ता (वय 33) असून तो एक ओला चालक आहे. त्याला पोलिसांनी अटक केली. पोलीस कोठडी दरम्यान आरोपीकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासामध्ये त्याने ठाणे पोलीस आयुक्तालयातील चैन जबरी चोरीचे 4 गुन्हे व चोरीचे 2 गुन्हे केल्याचे उघडकीस आले.