| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात पौष महिन्याच्या सुरुवातीलाच आंब्याच्या झाडांवर मोहोर फुटू लागल्याने शेतशिवारात आनंदाची लहर उसळली आहे. ग्रामीण भागातील सलग अंबराई तसेच शेतबांधांवर उभ्या असलेल्या संकरीत आणि गावरान आंब्याच्या झाडांवर प्रचंड प्रमाणात फुलोरा लागला आहे. झाडांच्या फांद्या मोहोरांनी अक्षरशः लदबदून गेल्या असून, हे नजारे पाहताच यंदाचे नैसर्गिक हवामान आंबा उत्पादनासाठी अनुकूल असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात रसाळ आंब्यांचा भरपूर आस्वाद घेता येईल, अशी उत्सुकता शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
महात्मा जोतिराव फुले श्रमजीवी जनता रोजगार हमी योजने अंतर्गत मिळालेल्या अनुदानाने गेल्या काही वर्षांत अनेक शेतकऱ्यांनी केशर, अल्फोंसो, दशहरी, पेटारकुंचा यांसारख्या सुधारित वाणांची सलग क्षेत्रीय लागवड केली आहे. ही झाडे आता फळधारणेच्या टप्प्यात येत आहेत. ‘कमी पाणी, कमी खत व कमी खर्चात चांगले उत्पादन मिळते, त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल, असे मत शेतकरी देवव्रत पाटील यांनी व्यक्त केले. विशेषतः संकरीत वाणांवर पौषातच मोहोर फुटतो, तर गावरान झाडांना जानेवारीच्या मध्यापर्यंत वाट पाहावी लागते. यंदा मात्र दोन्हींवर समान फुलोरा असल्याने हंगाम भरघोस राहील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.







