| तळा | प्रतिनिधी |
तळा तालुक्यात आंबा मोहरू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कोकणात आंबा उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. मात्र, ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस व लहरी हवामानामुळे आंबा काजू फळबागांना धोका निर्माण होतो. काही दिवसांपूर्वी तालुक्यात पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे या ठिकाणच्या हापूस बागा बऱ्यापैकी मोहरल्या आहेत. दरवर्षी वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात आंब्याला मोहोर लागतो. तालुक्यातील कर्नाळा, फळशेत, निगुडशेत, चरई, तळेगाव, राणेची वाडी आदी गावांमधून मोठ्या प्रमाणावर आंब्यांचे उत्पादन घेतले जाते. यातील काही माळ तळा बाजारपेठेत तर काही माल मुंबई ठिकाणी विक्रीसाठी पाठविला जातो. बऱ्याचदा व्यापारी वर्ग शेतकऱ्यांकडून घाऊक दराने फळ खरेदी करून सर्वच्या सर्व माल उचलतात. यातून शेतकऱ्याला भरघोस उत्पादनही मिळते. यावर्षी जानेवारी महिन्यात सुरुवातीपासूनच आंबा पीक मोहरला असल्याने नागरिकांना आंब्याची गोडी लवकरच चाखण्यासाठी मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
तळ्यात आंबा मोहरू लागला
