| जालना | वार्ताहर ।
मनोज जरांगे यांच्या उपोषणाला राज्यभरातून पाठींबा वाढत आहे. रवीवारी पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावल्याने ते बोलता-बोलता व्यासपिठावर आडवे झाले. त्यामुळे तेथे काही कालावधीसाठी वातावरण शांत झाले होते. सरकार या प्रश्नी कोणतीच भूमिका घेताना दिसत नसल्याने आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चर्चेला येण्याचे आवाहन केले. मला बोलता येतंय तोपर्यंत चर्चेला या, नंतर काही उपयोग नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. सरकारकडे दोनच पर्याय राहिले आहेत. मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा मराठ्यांशी सामना करा, असा इशाराही त्यांनी दिला. जरांगेनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी राज्याच्या विविध भागांमध्ये दिसून आली. आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी गावा-गावात उपोषण सुरु झाली आहेत. कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला झाला. काही ठिकाणी नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिला आहे. राज्यातील विविध मंत्री आणि नेत्यांना आपले नियोजीत दौरे रद्द करावे लागल्याचे बोलले जाते. खासदार संजय राऊत हे रविवारी दौंडमध्ये होते. त्यांना देखील बाईक रॅली रद्द करावी लागली. लातूरमध्ये एका माजी सरपंचाने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. बीडमध्ये एसटी बस फोडण्यात आली. आंदोलक आक्रमक होत असल्याने मराठा आरक्षण आंदोलन आता राज्यभर तीव्र होताना दिसत आहे.
मुख्यमंत्र्याच्या शब्दावर विश्वास ठेवा-फडणवीस मनोज जरांगे यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी, मराठा आरक्षणाच्या प्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः लक्ष दिले आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवावा असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
हिंगोलीचे खा. हेमंत पाटलांचा राजीनामा हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा दिला आहे. मराठा समाजातील आरक्षणाच्या मागणी करावी यासाठी काही आंदोलक त्यांच्या भेटीसाठी गेले असता त्या ठिकाणी आंदोलकांनी खासदारकीचा राजीनामा द्या, अशी मागणी केली. त्यानंतर हेमंत पाटलांनी तात्काळ लोकसभा अध्यक्षांच्या नावाने राजीनामा लिहून आंदोलकांना दिला. हेमंत पाटील हे हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून गेले आहेत. मराठा आरक्षणासाठी एखाद्या आमदार वा खासदाराने दिलेला हा पहिलाच राजीनामा आहे.
ते दुसऱ्याच्या ताटातलं मागत नाहीत- शरद पवार मी स्वतः जरांगे पाटील यांना भेटलो आहे. त्यांचे म्हणणे काय ते समजून घेतले. त्यातून मार्ग कसा काढता येईल याचा विचार विनिमय केला. दुर्दैवाने राज्य आणि केंद्र सरकारने या संदर्भात काही निर्णय देण्याची आवश्यकता होती ती त्यांनी घेतली नाही. त्याचा परिणाम महाराष्ट्रात वणवा पेटला आहे. ते दुसऱ्याच्या कोणाच्या ताटातलं मागून घेत नाहीत. जरांगे पाटील यांची भूमिका स्वच्छ आहे आणि पक्ष म्हणून आमचीही भूमिका स्वच्छ आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
सांगलीत एक दिवसाचे उपोषण सांगलीतील सर्व खासदार, आमदार सोमवारी उपोषण करणार आहेत. मराठा आरक्षण आणि जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी लोकप्रतिनिधी एक दिवसाचे उपोषण करणार आहेत.