मराठा आरक्षण प्रश्न चिघळणार

जरांगेचे पुन्हा उपोषण

| अंतरवाली | वृत्तसंस्था |

मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेली मुदत 24 तारखेला संपत आहे. त्यामुळे 25 तारखेपासून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. या काळात गावात घटनात्मक पदावर बसलेल्या कोणाही राजकीय नेत्याला येऊ दिले जाणार नाही. आरक्षण घेऊन गावात यायचे नाहीतर गावाच्या शिवेलासुद्धा शिवू देणार नाही. या उपोषणादरम्यान पाणी आणि औषधही घेणार नाही, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी जाहीर केली. केवळ अंतरवालीतच नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये मराठ्यांनी साखळी उपोषण सुरु करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

हे आंदोलन शांततेच्या मार्गाने होणार असून कुणीही उग्र आंदोलन करु नये. दि.28 पासून साखळी उपोषणाचे रुपांतर बेमुदत उपोषणात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आपल्याला आरक्षण घ्यायचे आहे, त्यामुळे कुणीही आत्महत्या करु नये. घटनेच्या पदावर असलेले पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री यांनी गावात न येण्याबाबत जरांगे यांनी भूमिका स्पष्ट केली नाही. आरक्षणाची भूमिका घेतली तरच आंदोलन मागे घेतले जाईल, असे त्यांनी सांगितलं. आमचे आंदोलन शांततेत होणार असून कुठेही गालबोट लागणार नाही, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येईपर्यंत आरक्षण दिले तर गुलाल भरुन गाड्या येतील. नाहीतर माणसं भरून गाड्या येतील. सरकारने आमचे लोक आमच्या विरोधात उतरवले आहेत. मात्र मराठ्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून लढावे. कुणीही आत्महत्या करु नये. राणे आणि कदमांच्या भूमिकेवर आता बोलणार नाही. सरकारला 40 दिवस देऊन सन्मान केला. आता 25 तारखेनंतर सरकारवर परिणाम होईल, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे.

Exit mobile version