। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
कोरोना महामारी संपली नसतानाच जगापुढे मारबर्ग विषाणूचे संकट उभे ठाकले आहे. हा विषाणू कोरोना, इबोलापेक्षाही भयानक संसर्गजन्य व जीवघेणा आहे. दक्षिण आफ्रिकन देश गिनीमध्ये या विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. संसर्ग झाल्यानंतर आठ दिवसांतच रुग्णाचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने सावधगिरीचा इशारा दिला आहे.
मारबर्ग विषाणू वटवाघळांपासून फैलावतो व त्याचा मृत्युदर 88 टक्क्यांपर्यंत आहे, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. 2 ऑगस्टला दक्षिण गुएकेडाऊ प्रांतामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला. सुरुवातीला त्याला इबोला झाल्याचा संशय होता, मात्र पोस्टमॉर्टमनंतरच्या नमुन्यांमध्ये त्याच्या शरीरात मारबर्गचा अत्यंत घातक संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले. हा विषाणू झपाटयाने खूप अंतरापर्यंत पसरू शकतो. त्यामुळे प्रसाराआधीच त्याच्या संसर्गाच्या वाटा रोखणे आवश्यक आहे, असे नमूद करीत आफ्रिकेतील डब्ल्यूएचओचे विभागीय संचालक डॉ. मात्शीदिसो मोएतो यांनी या विषाणूबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे.