जय हनुमान धेरंड संघ ठरला उपविजेता
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
वेश्वी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत मरीआई धेरंड संघाने प्रथम क्रमांक पटकवला, जय हनुमान धेरंड संघ द्वितीय, खारीकपाडा तृतीय तर आंदोशी संघ चतुर्थ क्रमांक मिळविला. सदर स्पर्धेचे उद्घाटन पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह आणि शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते झाले.
जिल्ह्यातील एकूण 32 संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मरीआई धेरंड संघाच्या ऋत्विक पाटील याने पटकवला. जय हनुमान धेरंड संघाच्या स्मित पाटील याला उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकडीसाठी खारीकपाडा संघाचा ओमकार मेस्त्री, पब्लिक हिरो आंदोशी संघाचा रोहित शेळके यांना पारितोषिक देण्यात आले.
कबड्डी स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांमधील खेळाडूंनी बहारदार खेळ करून क्रीडा रसिकांची मने जिंकली. काही सामने अनिर्णित राहिल्याने पाच चढायांवर निकाल देण्यात आले. जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रासह राष्ट्रीयस्तर गाजवणारे खेळाडू या स्पर्धेत पाहायला मिळाले. आपल्या संघाला विजयी करण्यासाठी चढाईपटूंनी केलेल्या चढाया आणि त्यांचे पदलालित्य त्याचबरोबर पकड करणारे क्षेत्ररक्षक या स्पर्धेचे खरे हिरो ठरल्याची चर्चा क्रीडांगणावर होती.
विजेत्या संघाना ओमकार क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, गिरीश शेळके, राकेश राऊळ, अमोल नलावडे, अमित मुळूस्कर, प्रशांत राऊळ यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी नाशिक सिन्नर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत रायगडच्या पुरुष संघाने तृतीय क्रमांक पटकवला. या संघातील खेळाडूंचा आणि प्रशिक्षक, पंच यांचा सन्मान करण्यात आला. रायगड जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत विजेत्या ओमकार क्रीडा संघातील खेळाडूंचा याचबरोबर जिल्हा निवड चाचणी स्पर्धा विजेत्या ओमकार वेश्वी संघातील मुलींच्या संघातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. ओमकार क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या या स्पर्धेला अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, वेश्वीच्या उपसरपंच आरती पाटील, सदस्य अनंत मुळूस्कर, राजेंद्र राऊळ, अरुण पाटील, जनार्दन पाटील आदी मान्यवरांनी भेट दिली. यावेळी निलेश नलावडे, प्रसाद मगर, किरण गुरव, सुशांत नलावडे, वीरू मगर, अंकित शेळके, निकेश शेळके, दिगंबर गोळे, निलेश मगर, हेमंत नाईक, सुरेश शेळके, मनीष पाटील, पंकज गुरव, सुयोग घरत, नंदकुमार मिसाळ, संदीप घरत, गौरव राऊळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
