आगळ्यावेगळ्या पतंगांनी बाजारपेठ फुलली
। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
थर्टीफस्ट नुकताच सरला आहे आणि आता सर्वांनाच वेध लागले आहेत ते मकरसंक्रांतीच्या सणाचे. आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सण हा अतिशय उत्साह, आनंद, एकमेकांना मान सन्मान देण्याची पध्दत, रूढी परंपरा यांना फार महत्व देऊन साजरा केला जातो. या परंपरा सुरू झाल्या त्यामागे देखील पुर्वजांचा एक चांगला हेतु असल्याचे लक्षात येते. मकरसंक्रात सणापुर्वी वातावरणात असतो तो कमालीचा गारठा. प्रत्येक सजीवाला या थंडीची हुडहुडी फार गारेगार करून सोडते. कधी एकदा सुर्य तापतोय आणि ही थंडी कमी होते असे प्रत्येकाला वाटते.
येत्या १५ जानेवारीला मराठमोळा मकरसंक्रांत हा सण सर्वत्र साजरा केला जाणार आहे आणि याची तयारी आतापासूनच सुरु झालेली आहे. मकरसंक्रांत म्हंटल की तिळगुळ बनवण्यापासून ते पतंग खरेदीपर्यंतची लगबग ही घरोघरी लागलेली असते परंतु असाच उत्साह सकाळपासून उंच उंच आकाशात पतंगांची शर्यत लावण्यासाठी अगदी लहानांपासुन ते मोठ्यांपर्यंत सगळेच सज्ज असतात.
त्याचबरोबर मकरसंक्रांतीला सुवासिनी एकमेकिंना सुगडयाचे वाण देतात या वाणात हरभरे, मटर, बोरं, उस, गहु, तीळ, नाणे, असल्याचे आपण पाहातो. या सणाच्या पार्श्वभुमीवर बाजारपेठा वेगवेगळ्या व रंगीबेरंगी पतंगांनी फुलल्या आहेत. लहानांनी पतंग व मांजा खरेदीकरण्यासाठी बाजारात गर्दी करताना दिसुन येत आहेत.
बाजारात आलेला मांजा
मकरसंक्रातीच्या पार्शवभूमीवर बाजारात सणानिमित्त लगबग सुरु झाली आहे. ग्राहकांची खरेदीसाठीची रेलचेल वाढत असल्याचे सुद्धा दिसून येत आहे. त्यातच आता बाजारात पतंग व मांजा बाजार दिसू लागला आहे. बाजारात विक्रीसाठी आलेला हा मांजा नायलॉन चा नसून खाल लावलेला मांजा आहे. या मांज्याची फिरकी ही ३० रुपयापासून ते ७० रुप्यापर्यंत आहे. जेवढी मोठी फिरकी तेवढी जास्त किंमत. त्याचबरोबर छोटे रीळ हे १५ रुपयांपासून सुरु आहेत.
रंगीबेरंगी पतंग
बाजारात विक्रीसाठी अनुक्तेच आलेले पतंग हे मेटॅलिक पेपर पासून तयार करण्यात आलेले आहेत. या हलक्या पेपरमुळे पतंग उंच उडण्यास मदत होते. त्याचबरोबर या पतंगांची किंमत ही १० रुपयांपासून सुरु होते. जेवढा चांगल्या दर्जाचा पतंग तेवढीच त्याची किंमत जास्त. साधारण १० रुपयांपासून ते ७० रुपयांपर्यंत पतंग बाजारात उपलब्ध झाले आहेत.