रस्ते अंधारले; बंदरातील कामकाजावरही ब्रेक
| उरण | प्रतिनिधी |
गुरुवार पहाटेपासून उरण परिसरावर दाट धुक्याची चादर पसरल्याने संपूर्ण परिसर काही काळ अक्षरशः ठप्प झाला. इतके दाट धुके होते की काही ठिकाणी समोरचे वाहनही दिसत नसल्याने वाहनचालकांची अक्षरशः धावपळ उडाली. रस्त्यांवरील दृश्यता अत्यंत कमी झाल्याने वाहन चालविणे धोकादायक ठरले.
उरणमधील मुख्य रस्त्यांवर वाहनांची गती मंदावली होती. काही ठिकाणी चालकांना वाहनांचे हेडलाईट लावून सावधगिरीने प्रवास करावा लागला. धुक्यामुळे बंदर परिसरातील हालचालींनाही मोठा फटका बसला. वाहनचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, दाट धुक्यामुळे उरण परिसरातील बंदराचे कामकाज काही काळासाठी ठप्प झाले होते. दृश्यता कमी झाल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव काही हालचाली थांबविण्यात आल्या. मात्र, कालांतराने धुक्याची तीव्रता कमी होत गेल्यानंतर परिस्थिती हळूहळू सुरळीत होऊ लागली. त्यानंतर रस्त्यांवरील वाहतूक तसेच बंदरातील कामकाज पुन्हा पूर्ववत सुरू झाले. तथापि अचानक पसरलेल्या या धुक्यामुळे उरणकरांना काही काळ गोंधळ आणि अडचणींचा सामना करावा लागला.







