सभा भाजपची अन्‌ चर्चा काँग्रेसची

अलिबागमध्ये बावनकुळेंचा फज्जा;
पंतप्रधानपदी राहुल गांधींना पसंती

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या महाविजय संकल्प यात्रेचे आयोजन अलिबागमध्ये करण्यात आले होते. कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आले होते. कार्यक्रमाप्रसंगी अतिउत्साहात बावनकुळे यांनी एका विक्रेत्याला भावी पंतप्रधान म्हणून कोणाला बघायला आवडेल? असा प्रश्न विचारताच त्यांनी क्षणभरही विचार न करता राहूल गांधी यांचे नाव घेतल्याने बावनकुळे चांगलेच बुचकळ्यात पडले. या घटनेमुळे भाजपच्या सभेतील उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये काँग्रेसचे खा. राहूल गांधी यांचीच चर्चा असल्याचे दिसून आले.

देशात 2024 साली लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. 18 व्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेतून पायउतार करण्यासाठी विरोधक इंडिया आघाडीच्या नेतृत्वाखाली एकत्र आले आहेत. भाजपशिवाय पर्याय नाही अशा अविर्भावात आलेल्या बावनकुळेंचा मात्र विक्रेत्याच्या प्रतिक्रियेने चांगलाच फज्जा उडाला.

भाड्याची गर्दी
भाजपच्या महाविजय संकल्प यात्रेत भाड्याची गर्दी असल्याची बाब उघड झाली आहे. इंडिया आघाडीच्या यशस्वी वाटचालीमुळे भाजपच्या कार्यक्रमाला गर्दी होणार नाही, ही बाब लक्षात येताच परिसरातील आदिवासी महिला-पुरुषांना रोजगार देऊन सभेला आणण्यात आले होते. याबाबत उपस्थित महिलांना विचारले असता त्यांना काही माहित नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
रणरणत्या उन्हाचे चिमुकल्यांना चटके
अलिबाग तालुक्यातील अनेक भागातून मोठ्या संख्येने आदिवासी समाज या कार्यक्रमात सहभागी झाला होता. महिला आपल्या चिमुकल्या लेकरांना घेऊन सहभागी झाल्या होत्या. भर दुपारी 12 वाजताचे उन्हाचे चटके त्या चिमुकल्यांनाही सोसावे लागले.
पतीच्या प्रवेशानंतर आठ महिन्याने केला पत्नीने प्रवेश
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोर शक्तीप्रदर्शन करण्यासाठी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांनी अनेक पराक्रम केले. आठ महिन्यांपूर्वी भाजपमध्ये स्वतः प्रवेश केल्यानंतर त्यांच्या पत्नी झिराड सरपंच दर्शना भोईर यांचा प्रवेश मात्र बावनकुळेंच्या सभेत बुधवारी करण्यात आला. त्यामुळे कार्यकर्त्यांना हसावे की रडावे, हेच कळत नव्हते. यावेळी मनोगत व्यक्त करताना दिलीप भोईर यांनी आपला प्रवेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होईल, अशी आशा होती. मात्र तसे न झाल्याची खंत ही बोलून दाखवली.

याच सभेत पाच हजार कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश जाहीर करण्यात आला. पण प्रत्यक्षात जेमतेम हजार कार्यकर्ते उपस्थित होते. त्यात भाजपचे विद्यमान कार्यकर्ते किती, हा देखील कळीचा मुद्दा आहे.

Exit mobile version