सकाळी-सकाळी अलिबाग शेकाप शहर चिटणीस अशोक प्रधानचा फोन आला… मीनाक्षीताई गेल्या. क्षणभर मी स्तब्धच झालो… काय बोलायचं सुचेच ना! एखादी आवडती व्यक्ती गेल्यावर धक्का बसतो, तसं काहीसं झालं. एरवी ताईंबद्दल भरभरून लिहिणारा मी, आत्ता मलाही कसं लिहावं, का लिहावं, किती लिहावं, हेच सुचत नाही. खरोखरच असं वाटतंय की, सारे शब्दच गोठून गेलेत. अर्थात, कारणही तसंच आहे.
गेली पन्नासेक वर्षे मी शेकापची विविध आंदोलने पाहतोय. सर्वच आंदोलनामध्ये ताईंनी हिरीरीने घेतलेला सहभागही पाहिलाय. मीनाक्षीताई पाटील म्हणजे संघर्ष… संघर्ष आणि संघर्ष!! अन्याय सहनच न होणारा स्वभाव, त्यामुळे ताईंना पोलिसांच्या अनेकदा लाठ्याकाठ्यांना, तर कधी कधी तुरूंगवासही भोगावा लागला.
अन्यायाविरूध्द सततचा संघर्ष, दडपशाहीविरूद्ध निडरपणे, बेडरपण अनेकदा केलेला सामना, प्रस्थापितांविरूद्ध, सत्तेविरूद्ध खंबीरपणे पाय रोवून उभे राहण्याचे धाडस यामुळेच ताईंना ‘रायगडची रणरागिणी’ अशी सार्थ उपाधी जनतेने दिली. लहानपणी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात अॅड. दत्ता पाटलांसोबत, सका पाटलांसमोर केलेले आंदोलन असो की नंतरच्या काळातील मंत्र्यांना जिल्हाबंदी असताना अर्बन बँकेसमोर गृहराज्यमंत्री ना. रत्नाप्पा कुंभार यांच्यासमोरचे आंदोलन असो… ताई नेहमीच संघर्षाच्या पावित्र्यात राहिल्या.
मीनाक्षीताईंना अमोघ वक्तृत्वाचे वरदान प्रत्यक्ष सरस्वतीकडूनच मिळाले होते, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. ज्ञानेश्वरीतील ओव्या, तुकारामगाथा यातील उदाहरणे देत-देत त्यांचे भाषण त्या असे काही फुलवायच्या, की श्रोते अगदी मंत्रमुग्धच व्हायचे. अलिबागेतील कोमसापच्या उद्घाटन समारंभात सूत्रसंचालन करताना त्यांनी केलेलं ना. अंतुलेसाहेबांचं वर्णन आजही मनावर ठसलंय. रायगडावरील शिवराज्याभिषेकाच्या त्रिशतकसमारोहानिमित्त त्यांचे भाषण हेही त्यांच्या अनेक उत्कृष्ट भाषणांपैकी एक होते.
एकदा आरसीएफच्या जनरल मॅनेजरसोबत त्यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी त्या राज्यमंत्री होत्या. गप्पांच्या ओघात बाबा आमटेंचा विषय निघाला. आणि लगेचच, ताईंनी बाबांच्या ‘ज्वाला व फुले’ कवितासंग्रहातील अनेक कविता म्हणून दाखविल्या. खरं तर, आम्हाला धक्काच बसला होता. कारण आम्ही गेलो होतो ते, रणरागिणी नामदार मीनाक्षी पाटलांना भेटायला आणि अनपेक्षितपणे आम्हाला भेटल्या होत्या साहित्यिक आणि कवीमनाच्या मीनाक्षीताई.
राजकीय रणधुमाळी गाजवावी ती मीनाक्षीताईंनीच. सत्ताधारी पक्षावर घनघोर टीका करताना त्यांची भाषा अगदी मर्मभेदी असायचीच; पण कधीही त्यांनी टीका करताना पातळी सोडली नाही. राजकारणात विरोधी असो की स्वपक्षातील, त्या थोरामोठ्यांचा आदरपूर्वकच उल्लेख करीत. बॅ. अंतुले आणि अॅड. दत्ताजीराव खानविलकरांसोबत राजकीय आणि वैचारिक मतभेद जरी असले, तरी त्यांची विद्वत्ता आणि ज्येष्ठता याबद्दल ताईंना नेहमीच आदर वाटला.
जिल्ह्यातील एका मात्तबर राजकीय घराण्याचा वारसा त्यांना लाभला. पत्रकार संघ, रायगड बाजार चेअरमन, जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि राज्यमंत्री असा प्रदीर्घ आणि चतुरस्त्र अनुभव संपन्न असूनदेखील ताई नेहमीच निगर्वी आणि डाऊन-टू-अर्थ राहिल्या. मला आठवतं, त्यांच्या एका आमदारकीच्या निवडणुकीत त्यांच घोषवाक्यच होतं… ‘उतणार नाही, मातणार नाही… घेतला वसा टाकणार नाही.’ थोरामोठ्यांपासून ते अगदी सामान्यांना ताईच्या लेखी सारखीच ट्रीटमेंट मिळे.
जिल्ह्यातील महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रसंगी ताई सर्वस्व पणाला लावीत. त्यांनीच मला सांगितलेला एक प्रसंग. श्रीवर्धन तालुक्यातील लिपणिवावे या गावातील दारू दुकानामुळे गावातील तरूणाई व्यसनाधीन होऊ लागली होती. गावातील महिलांनी शासन दरबारी अनेक वेळा अर्ज विनंत्या केल्या. परंतु, काही बड्या मंडळींचा आतून पाठिंबा असल्याने दारूचे दुकान काही बंद होईना. शेवटी सर्व महिला ताईंना भेटल्या. त्यांनीदेखील सामोपचाराने सर्व मार्ग अवलंबिले. परंतु, तरीही दुकान काही बंद होईना! मग शेवटी विधिमंडळात ताईंनी रुद्रावतार धारण केला. ताईंचा तो आविर्भाव पाहून संबंधित मंत्रीमहोदयांची गाळण उडाली आणि तात्काळ लिपणिवावेमधील ‘ते’ दारू दुकान बंद झाले. असा होता आमच्या ताईंचा दरारा नि दबदबा!
वर्षामागून वर्षे गेली, काळ बदलला, राजकारणाचा पोतही बदलला. राजकारणावर अर्थकारण भारी ठरू लागले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे मीनाक्षीताईंनीही हळूहळू अॅक्टीव राजकारणातून लक्ष कमी केले. परंतु, तरीही रायगडमधील जनता ‘मीनाक्षीताई’ म्हटलं की आजही गर्दी करतच होती. कणखर, खंबीर मीनाक्षीताईंच्या अमोघ, ओघवत्या भाषेने हजारो कार्यकर्त्यांना स्फूरण चढत होते. भाषणाला उभ्या राहिल्यावर त्यांचा तो काळजाला भिडणारा आवाज आठवला की आजही अंगावर शहारा येतो.
अलिबागच्या आदर्श पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी समारंभातील त्यांचे भाषण, मी ऐकलेले शेवटचे सार्वजनिक भाषण. प्रकृतीमुळे ताई बहुदा बोलणार नाहीत असं वाटलं होतं. परंतु, ताईंनीच स्वत:हून आग्रहाने, मी बोलणार असं सांगितलं आणि प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच स्वागत केलं.
मी फक्त दोन मिनिटे बोलेन अशी सुरुवात करणार्या ताईं तब्बल दहा-पंधरा मिनिटे बोलल्या, तेही अस्खलीत, फर्ड्या आवाजात आणि नेहमीच्याच तडफेने. आज तो आवाज लुप्त झाला. शेतकरी कामगार पक्षाचे हजारो कार्यकर्ते आज हळहळत आहेत. महिलांच्या प्रश्नावर खमकेपणाने टक्कर देणारे नेतृत्व आज पडद्याआड गेलंय. खरं तर, आजकाल ताई राजकीयदृष्ट्या एवढ्या सक्रीय नव्हत्या, तरी ताईंच ‘असणं’ हेच मुळी सर्वांना आश्वासक वाटत असे.
खरं तर, ताई आज आपल्यात नाहीत, यावर विश्वास बसणं कठीणच आहे. शेकाप कुटुबांला हे दु:ख पचवणं कठीणच आहे. परंतु तरीही, मीनाक्षी पाटलांनी आयुष्यभर जो गोरगरीबांच्या कल्याणाचा, डाव्या विचारसरणीचा वसा घेतला, तो वसा तसाच चालू ठेवून, त्याला नवा आयाम प्राप्त करून देणं हीच खरी ताईंना श्रद्धांजली ठरेल.
ताई, पेझारीला बंगल्यावरून जाताना आपली खूप आठवण येईल… खरंच






