दोशी महाविद्यालयाच्या युवतींचा अखंड भारताचा संदेश

गुवाहाटी ते मुंबई गेटवे 2751 किमीचा सायकल प्रवास

| घाटकोपर । वृत्तसंस्था ।

मातृभूमीचे महत्त्व आणि विविधतेत एकता हा वारसा जपणार्‍या भारत देशात जनजागृतीचा प्रसार करण्यासाठी घाटकोपरच्या पी.एन.दोशी महिला महाविद्यालयाच्या 21 धाडसी युवतींनी 21 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत, म्हणजे 26 दिवस गुवाहाटी ते गेटवे 2751 किमीचा सायकल प्रवास पूर्ण केला. मुंबई गेटवे चर्चगेट येथे या 21 धाडसी मुलींचे मोठ्या दिमाखात स्वागत करण्यात आले. गुवाहाटी ते गेटवेपर्यंत सायकल प्रवास करून विविधतेत एकता जतन करणार्‍या अखंड भारताचा संदेश या युवतींनी दिला.

एस. पी. आर. जे. कन्याशाळेचे शतकमहोत्सवी वर्षाचे महत्व साधून श्रीमती पी एन दोशी महिला महाविद्यालयाच्या महत्त्वकांक्षी विद्यार्थी, शिक्षक व प्राचार्यांनी चौथे सायकलेथॉन आयोजित केले होते. दरवर्षी नवनवीन संकल्पनेतून महाविद्यालयाच्या वतीने मुलींसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांच्यात जनजागृती केली जाते. यंदा ‘मुली वाचवा मुली शिकवा’ हा संदेश या सायकल प्रवासाच्या माध्यमातून गुवाहाटी ते मुंबई असा देण्यात आला. महाविद्यालयाच्या या अनोख्या उपक्रमाचे पालकांसह सर्वच क्षेत्रातून या युवतींच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे. वरिष्ठ आणि कनिष्ठ वर्गातील या निवडक मुलींचा कसून सराव करून घेण्यात आला होता. खाण्या पिण्याचे पथ्य, रोजच डायटेनिंग सांभाळून त्यांचे फिटनेस पाहून त्यांना या प्रवाहात आणले गेले. या मोहिमेसाठी मुलींचे मानसिक व शारीरिक तपासणी करून घेऊन त्यांचे समुपदेशन देखील यावेळी करण्यात आले होते.

गुवाहाटी ते मुंबई गेटवे अशी या धाडसी विद्यार्थिनीनी आसाम, पश्‍चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र अश्या सहा राज्यात एकात्मतेचा संदेश देत सायकल सफर करत आलेल्या धाडसी 21 विद्यार्थिनींचे एसएनडीटी विद्यापीठ चर्चगेटच्या प्रांगणात, ढोल ताशांच्या गजरात, विद्यापीठाच्या कुलगुरू प्रोफेसर उज्वला चक्रदेव यांच्या उपस्थितीत विद्यापीठ व पी. एन. दोशी महाविद्यालय यांनी एकत्रितरित्या स्वागत केले. अध्यक्षीय भाषणात विद्यापीठाच्या कुलगुरूंनी ह्या 21 विद्यार्थिनी आणि सायक्लोथॉनमध्ये सहभागी झालेले शिक्षक व महाविद्यालयाचे भरभरून कौतुक केले. ”या सायक्लोथॉनद्वारे या विद्यार्थिनींनी शिक्षणाची मूलभूत गरज सर्वांगीण विकासासाठी असते आणि सायक्लोथॉनसारख्या मोहिमेत सहभागी होऊन विद्यार्थिनींमध्ये खर्‍या अर्थाने अमुलाग्र बदल होतो आणि जगातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्या तयार होतात” असे नमूद केले. यापूर्वीही 2006 मध्ये मुंबई ते रत्नागिरी व रत्नागिरी ते मुंबई त्याचप्रमाणे 2016 मध्ये मुंबई ते पुणे, व पुणे ते मुंबई अशा प्रकारे यशस्वी सायकल सवारी काढण्यात आली होती. सर्वात महत्त्वाची आणि अविस्मरणीय काश्मीर ते कन्याकुमारी ही सायकल सफारी 21 विद्यार्थिनींनी 2019 साली यशस्वीपणे पार पाडली होती.

या आहेत 21 धाडसी विद्यार्थिनी
रितू पवार, इशिका यादव, दिव्या पांडे, रागिणी यादव, सायरा मोहमद शेख, मेहेक दामा, रिया पवार, हिरल पटेल, कीर्ती वाळुंज, कृतिका बिर्जे, फरहा खान, रिया बडवे, रोमा दुबे, अनम शेख, स्वाती गुप्ता, नेहा मौर्या, श्रुती पांडे, शहीर अन्सारी, सिया मिश्रा, सृष्टी होटा, गौरी देवेंद्र.
Exit mobile version