साफसफाईतून स्वच्छतेचा संदेश

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

। अलिबाग । प्रतिनिधी ।

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी स्वच्छता ही महत्वाची आहे. हा उद्देश समोर ठेवून विजया-दर्शना सामाजिक संस्थेने सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे. संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून वावे पोटगे येथील परिसरातील प्राचीन जागृत देवस्थान श्री काळकाई माता मंदिर परिसरात या समाजिक संस्थेने स्वच्छता मोहीम राबविली. यावेळी मंदिर परिसरातील कचरा साफ करण्यात आला. या साफसफाईतून स्वच्छतेचा संदेश पोहचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

भोनंग येथील विजया-दर्शना समाजिक संस्थेने सामाजिक कार्याचे पहिले पाऊल उचलून सुमारे 200 जणांना एकत्र करून पर्यावरण स्वच्छता अभियान मोहीमेचा श्री गणेशा केला आहे. या संस्थेचे अध्यक्ष आशिष परकर यांनी अलिबाग तालुक्यातील भोनंग-डोंगरी येथील महिला मंडळ, ग्रामस्थ, सीएमडी बॉईज ग्रुपचे तरुण-तरुणींना सोबत घेऊन येथील मंदिर परिसराची स्वच्छता करून घेतली. त्याचबरोबर परकर यांनी गावकर्‍यांना स्वच्छतेचे महत्व सांगून यापुढे ही संस्था समाजाच्या उन्नतीसाठी अशीच विविध क्षेत्रात पर्यावरणीय व सामाजिक कार्य करीत राहिल, असा विश्‍वास दिला. दरम्यान, या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. तरुणांसह अनेक मंडळी या उपक्रमात स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले होते.

Exit mobile version