मेट्रो स्थानकाचे नामकरण ‘पेणकर पाडा’ व्हावे

सक्षम युवा प्रतिष्ठान मागणी

| मुंबई | प्रतिनिधी |

स्थानिक नागरिकांना, भूमिपुत्रांना विश्वासात न घेता एमएमआरडीएच्या वतीने मेट्रो स्थानकाला सुचवण्यात आलेल्या ‘पांडुरंग वाडी’ या नावाला सक्षम युवा प्रतिष्ठानने विरोध दर्शविला आहे. त्यामुळेच मिरा भाईंदर महापालिका क्षेत्रातून जाणाऱ्या मेट्रो स्थानकांच्या नावावरून नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

बरेचदा नामकरण हा मुद्दा भावनाप्रधान ठरत असतो. यामुळेच नामकरणाबाबत वेगवेगळे मतप्रवाह असलेल्या नागरीकांमधील वाद विकोपाला जाण्याची शक्यता असतात. याचा विचार करून एमएमआरडीएने स्थानकाचे नामकरण करताना वर्षानुवर्षे त्या भागात राहणारे मूळ रहिवासी, स्थानिक नागरीक यांना विश्वासात घेऊन सर्वसमावेशक निर्णय घ्यावा, असे सक्षम युवा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

सक्षम युवा प्रतिष्ठानने यासंदर्भात स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांची भेट घेऊन मिरा भाईंदर मेट्रो क्र 9 मधील पांडुरंगवाडी स्थानकाच्या नावाला विरोध दर्शवत पेणकर पाडा असे नामकरण व्हावे, याबाबत आपली भूमिका मांडत सविस्तर निवेदनही सादर केले. याप्रसंगी सक्षम युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड.नितेश म्हात्रे, कार्याध्यक्ष ॲड.अविनाश सुर्यवंशी, खजिनदार भूषण कोळी उपस्थित होते.

पांडुरंग वाडी हे त्या भागातील एका मर्यादित परिसराचे नाव आहे. परंतु, ‘पेणकर पाडा’ हे नाव मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या आणि महसूल विभागाच्या नोंदीमध्ये सुमारे 40 ते 50 वर्षांहून अधिक काळापासून अधिकृतपणे नमूद असून या गावाला स्वतंत्र असा सामजिक, प्रशासकीय, ऐतिहासिक वारसा लाभला आहे. ही बाब लक्षात घेता स्थानकाचे नामकरण ‘पेणकर पाडा’ असेच व्हावे, ही पेणकर पाड्यातील समस्त नागरिकांची आग्रही मागणी आहे.

– ॲड नितेश म्हात्रे, अध्यक्ष, सक्षम युवा प्रतिष्ठान

Exit mobile version