तटकरेंची डोकेदुखी वाढली, गीतेंना पोषक वातावरण
। रायगड । आविष्कार देसाई ।
धैर्यशील पाटील यांनी आपली तलवार म्यान केल्याने त्यांचे समर्थक नाराज असल्याची चर्चा आहे. आता 4 जूनला निकाल लागल्यानंतरच पेणमधील संपर्क कार्यालय उघडा, तोपर्यंत त्याला टाळे ठोका, असाही एक मतप्रवाह पेणमध्ये आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना पाटील यांची चांगलीच दमछाक होत असल्याचे दिसून येते. पदाधिकारी आणि नेत्यांची मने जुळली असली, तरी भाजपाचे कार्यकर्ते नाराज असल्याने सुनील तटकरेंसाठी डोकेदुखी वाढली आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्यासाठी अधिक पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
शेकापबरोबर फारकत घेत धैर्यशील पाटील यांनी भाजपाची वाट चोखाळली. पक्ष प्रवेशापूर्वी रायगडमधील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यामध्ये चांगलीच हवा भरली होती. त्यामुळे पाटील यांनादेखील दिवसादेखील दिल्ली दिसत असावी. निष्ठेसाठी त्यांनी भाजपाचा अजेंडा राबवण्यास सुरुवात केली. विविध कार्यक्रम, सभा घेतल्या, बूथ पातळीवरील कार्यक्रम हाती घेतले. त्यामध्ये त्यांची आर्थिक शक्तीही खर्च झाली. आपल्यालाच लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी वरिष्ठांमार्फत चांगलीच फिल्डींग लावली होती. मात्र, ऐन धामधुमीत सुनील तटकरे यांनी उमेदवारी मिळवत धैयशील पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांचीच विकेट काढली. मुंबईतील बैठकीमध्ये पक्षश्रेष्ठींसमोर तटकरेंना मदत करणार असल्याचे एकमुखाने सर्व पदाधिकारी आणि नेत्यांनी मान्य केले असले, तरी कार्यकर्ते मात्र चांगलेच नाराज असल्याचे चित्र आहे.
भाजपामधील हेच कार्यकर्ते सुनील तटकरेंसाठी डोकेदुखी ठरणार आहेत. धैर्यशील पाटील यांना महायुतीतून उमेदवारी मिळाली नाही, तर त्यांनी अपक्ष लढावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. पाटील यांनी तलवार म्यान केल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. तटकरेंच्या प्रचाराबाबत त्यांच्यामध्ये निरुत्साही वातावरण आहे. त्यामुळे तटकरेंसाठी लढाई कठीण असली, तरी इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्यासाठी हे पथ्यावर पडणार असल्याचे दिसते. तटकरेंवर नाराजी असल्याने हे कार्यकर्ते कोणाच्या पारड्यात मतदान करणार याबाबतही संभ्रम आहे.