| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ येथून माथेरानकडे जात असताना मिनीट्रेनच्या इंजिनात बिघाड झाल्याने पर्यटकांचे मोठे हाल झाले. त्यावेळी त्या मिनीट्रेनमधून 80 प्रवासी होते. त्या प्रवाशांना मध्य रेल्वेने त्यांच्या तिकिटांचे पैसे परत देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय इंजिन रुळावरून खाली उतरल्याने एक प्रवासी गाडी रद्द करण्यात आली.
सोमवारी नेरळ माथेरान नेरळ 52105 ही गाडी निघाली होती. साडे बारा वाजता वॉटर पाईप स्टेशन येथे पोहचली आणि ती मिनी ट्रेन घेऊन जाणारे इंजिन एनडीएम 476 हे रुळावरून खाली आले. त्यानंतर नेरळ येथून नॅरोगेज रुळावरून खाली उतरलेले इंजिन उचलण्यासाठी कामगार वर्ग बोलाविण्यात आले. मात्र रुळावरून इंजिन उतरले की किमान दोन तासाचा कालावधी गाडी उचलण्यासाठी लागत असतो हे लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने त्या गाडीतून नेरळ ते माथेरान असा प्रवास करणारे 80 प्रवासी यांच्या तिकिटाचे पैसे परत देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या सर्व प्रवाशांनी माथेरान स्थानकात जाऊन आपल्या तिकिटाचे पैसे परत घ्यावेत असे सूचित करण्यात आले.त्यानंतर सर्व प्रवाशांनी वॉटरपाईप स्टेशन बाहेर येऊन नेरळ माथेरान प्रवासी टॅक्सी मधून दस्तुरी असा प्रवास केला आणि माथेरान मध्ये पोहचले.
दुसरीकडे रुळावरून उतरलेल्या मिनीट्रेनचे इंजिन सव्वा तीन वाजता उचलण्यात आले आणि त्यानंतर 52105 ही गाडी वॉटर पाईप स्थानकातून नेरळ करिता सोडण्यात आली. कोणत्याही प्रवाशाविना वॉटर पाईप स्थानकातून निघालेली ती मिनीट्रेन पुन्हा एकदा जुम्मापट्टी स्थानकात थांबविण्यात आली. तर तिकडे माथेरान स्थानकातून नेरळ करिता दुपारी दोन वाजून 35 मिनिटांनी सोडली जाणारी मिनीट्रेनची फेरी रद्द करण्यात आल्याने पर्यटक प्रवासी यांचे नेरळ पर्यंत जाण्याचे स्वप्न अधुरे राहिले. माथेरान येथून नेरळ करिता दररोज दोन प्रवासी गाड्या सोडल्या जातात, त्यापैकी एकच गाडी सोडण्यात आली आणि ती गाडी माथेरान स्थानकातून दुपारी चार वाजता निघाली आणि पर्यटकांना घेवून सायंकाळीं सात वाजता नेरळ स्थानकात पोहचली. मात्र इंजिन रुळावरुन खाली उतरल्याने वॉटर पाईप स्थानकातून दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी नेरळ करीत प्रवास सुरू करणारी 52105 ही रिकामी मिनी ट्रेन नेरळ स्थानकात रात्री नऊ वाजता पोहचली.