बेपत्ता मुलगी घरी सुखरुप परतली

उरण पोलिसांची यशस्वी शोधमोहीम
। उरण । वार्ताहर ।
अस्मिता गुरूनाथ कातकरी ही सारडे बेलवाडी आदिवासी वाडीवरील मुलगी 20-25 दिवसांपासून बेपत्ता होती. या संदर्भातील फिर्याद तिच्या आईने उरण पोलीस ठाण्यात नोंदविली होती. पोलिसांनी उत्तर प्रदेशातून सुखरुप आणून घरच्यांच्या ताब्यात दिले.
मुलीचा कुठल्याही प्रकारचा ठावठिकाणा मिळत नव्हता. याच दरम्यान सदरहू बेपत्ता झालेल्या मुलीने तिच्या आईशी मोबाईलद्वारे संपर्क साधला. हाच धागा पकडून वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल राजवाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार केले. श्री. राजवाडे यांनी बेपत्ता मुलीच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस करून आपल्या सहकार्‍यांसह उत्तर प्रदेशातील लखनौ शहर गाठले. या पथकाने मुलीला लखनौ शहरातून ताब्यात घेऊन उरण येथे सुखरुप आणले. या कामगिरीबद्दल उरण पोलीस ठाण्यातील अधिकार्‍यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. उरण सामाजिक संस्थेतर्फे संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, सरचिटणीस संतोष पवार, प्रा. राजेंद्र मढवी, शेखर पाटील, मधुकर भोईर यांच्या हस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजवाडे, इतर अधिकारी यांचे प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले.

Exit mobile version